⛔कारागृहातील कैद्यांच्या पुनर्वसन व सुधारणेतील उल्लेखनीय कार्याची शासनाकडून दखल
✍️पांढरकवडा: अशफाक खान
स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर पांढरकवडा शहराच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. पांढरकवडा येथील सुपुत्र तथा महिला कारागृह अधीक्षक, जिल्हा कारागृह भायखळा, मुंबई येथील श्री. विकास हनमंतु रजनलवार यांच्या उल्लेखनीय व प्रशंसनीय सेवाकार्याची शासनाने दखल घेत त्यांना राष्ट्रपती सेवा सुधार पदक जाहीर केले आहे. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला या प्रतिष्ठेच्या पुरस्काराची घोषणा झाल्याने पांढरकवडा परिसरातून रजनलवार यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
श्री. विकास रजनलवार यांनी कारागृह प्रशासनातील अतिसंवेदनशील विभागात कार्यरत असताना कैद्यांच्या पुनर्वसनासोबतच त्यांच्या वर्तनात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी आणि सुधारणा प्रक्रियेला चालना देण्यासाठी उल्लेखनीय योगदान दिले. कारागृहातील बंदिवानांकडे केवळ गुन्हेगार म्हणून न पाहता, त्यांच्यातील सकारात्मक बदलांना प्रोत्साहन देत त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात पुन्हा आणण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांची शासनाने विशेष दखल घेतली.

मध्यवर्ती तसेच जिल्हा कारागृहांमध्ये कार्यरत असताना त्यांनी कारागृह व्यवस्थापन, शिस्त, कैद्यांचे पुनर्वसन आणि सुधारणा याबाबत जबाबदारीने काम केले. त्यांच्या कार्यक्षम नेतृत्वामुळे आणि कर्तव्यनिष्ठ सेवेमुळे कारागृह प्रशासनात त्यांनी वेगळी ओळख निर्माण केली आहे.
दि. १५ ऑगस्ट २०२६ रोजी कारागृह महानिरीक्षक, पुणे, महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते श्री. विकास रजनलवार यांना राष्ट्रपती सेवा सुधार पदक, सन्मानपत्र व पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले . देशाच्या स्वातंत्र्यदिनाच्या दिवशीच आपल्या सेवाकार्याचा हा बहुमान मिळणे ही त्यांच्या कारकिर्दीतील अत्यंत अभिमानाची आणि संस्मरणीय बाब ठरली.
कारागृहासारख्या अतिसंवेदनशील क्षेत्रात प्रामाणिकपणे, निष्ठेने आणि मानवी दृष्टिकोनातून सेवा बजावत कैद्यांच्या सुधारणा व पुनर्वसनासाठी केलेल्या कार्याला मिळालेला हा सन्मान केवळ श्री. विकास रजनलवार यांचाच गौरव नसून पांढरकवडा शहरासाठीही अभिमानाचा क्षण मानला जात आहे.

राष्ट्रपती सेवा सुधार पदक जाहीर झाल्याची माहिती मिळताच पांढरकवडा शहरातील नागरिक, सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते, मित्रपरिवार आणि विविध स्तरातील मान्यवरांकडून श्री. विकास रजनलवार यांचे अभिनंदन करण्यात आले.
कर्तव्यनिष्ठा, संवेदनशीलता आणि सुधारणेची सकारात्मक दृष्टी यांचा संगम साधत कारागृह प्रशासनात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या श्री. विकास रजनलवार यांना मिळालेला हा सन्मान निश्चितच अनेकांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.









