⛔पोक्सो कायद्यानुसार कठोर निकाल; ७ हजार रुपयांचा दंड, अन्य कलमांतही कारावास
✍️पांढरकवडा: अशफाक खान
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी केळापूर न्यायालयाने आरोपीला कठोर शिक्षा सुनावली आहे. सुनील भिमा ऊर्फ भिमराव टेकाम (वय २४, रा. मुलकीपोंड, ता. झरी-जामणी, जि. यवतमाळ) याला पोक्सो कायद्याच्या कलम ४ अंतर्गत २० वर्षांची शिक्षा व ७ हजार रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. दंड न भरल्यास अतिरिक्त कारावासाची शिक्षाही सुनावण्यात आली आहे.
न्यायालयीन नोंदीनुसार, १० डिसेंबर २०२१ रोजी आरोपीने १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप होता. पीडित मुलीने घडलेली घटना आपल्या आईला सांगितल्यानंतर प्रकरण उघडकीस आले. त्यानंतर पीडितेला तिच्या आईसह पोलीस ठाणे मुकुटबन येथे आणण्यात आले आणि आरोपीविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली.
या प्रकरणी तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक अजित जाधव, पोलीस ठाणे मुकुटबन यांनी तपासाची सूत्रे हाती घेतली. आरोपीविरुद्ध भारतीय दंड विधानातील कलम ३६३, ३७६, ५०६ तसेच पोक्सो कायदा २०१२ मधील कलम ४ व १७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तपासादरम्यान आवश्यक कागदपत्रे, वैद्यकीय तपासणीचे अहवाल, साक्षीदारांचे जबाब आणि इतर पुरावे संकलित करून प्रकरणाचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले.

अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा विशेष न्यायाधीश श्री. एम. ए. कोठारी, पांढरकवडा यांच्या न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी झाली. खटल्यादरम्यान सरकारी पक्षाने एकूण ९ साक्षीदारांची साक्ष नोंदवली. सरकारी पक्षाच्या वतीने सहाय्यक सरकारी अभियोक्ता श्री. दिलीप निमकर यांनी प्रभावी युक्तिवाद करत आरोपीविरुद्धचे पुरावे न्यायालयासमोर मांडले.
सरकारी पक्षाचा युक्तिवाद, साक्षीदारांची साक्ष तसेच उपलब्ध पुरावे विचारात घेत न्यायालयाने आरोपीला संबंधित कलमांखाली दोषी ठरविले. पोक्सो कायदा कलम ४ अंतर्गत २० वर्षांची शिक्षा व ७ हजार रुपये दंड, तर कलम १७ अंतर्गत ५ वर्षांची शिक्षा व ७ हजार रुपये दंड सुनावण्यात आला. तसेच भारतीय दंड विधानातील कलम ५०६ अंतर्गत २ वर्षांची शिक्षा व ३ हजार रुपये दंड ठोठावण्यात आला. संबंधित दंडाची रक्कम न भरल्यास अतिरिक्त कारावासाची शिक्षा देखील सुनावण्यात आली आहे.
या प्रकरणाच्या तपासात पोलीस निरीक्षक अजित जाधव यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. न्यायालयीन कामकाजात सरकारी अभियोक्ता दिलीप निमकर यांना पोलीस ठाणे मुकुटबन येथील पोलीस नाईक शोभा मडावी यांनी सहकार्य केले.









