⛔ सर्वधर्मीय युवकांचा उत्स्फूर्त सहभाग; १४२ युनिट रक्त संकलित
✍️पांढरकवडा | अशफाक खान
हजरत मोहम्मद पैगंबर यांनी संपूर्ण मानवजातीला बंधुभाव, दया, परोपकार आणि संकटग्रस्तांना मदत करण्याची शिकवण दिली. त्यांच्या मानवतावादी विचारांना कृतीची जोड देत ईद मिलादुन्नबीच्या पवित्र पर्वानिमित्त पांढरकवडा येथे भव्य ऐच्छिक रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात सर्वधर्मीय युवकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत तब्बल १४२ युनिट रक्तदान केले.
मुस्लिम युवावर्ग पांढरकवडा आणि एकनील ब्लड सेंटर, यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार, दि. २६ ऑगस्ट २०२६ रोजी स्थानिक शहीद नागेश्वर जिड्डेवार भवन येथे हे रक्तदान शिबिर पार पडले. सकाळपासूनच रक्तदात्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहत सामाजिक बांधिलकी जपली.

शिबिराचे उद्घाटन जामा मशिदीचे अध्यक्ष मौलाना काजी गजनफर अली यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मौलाना अबूजर कासमी, नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष आतिश चव्हाण, पोलीस निरीक्षक एल. डी. तावरे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
🎯 रक्तदानातून माणुसकी आणि सामाजिक सलोख्याचा संदेश
ईद मिलादुन्नबीचा उत्सव केवळ धार्मिक कार्यक्रमापुरता मर्यादित न ठेवता मानवकल्याणाचा संदेश प्रत्यक्ष कृतीतून देण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला. ‘रक्ताला जात-धर्म नसतो; ते एखाद्याचा जीव वाचवते’ हा संदेश या शिबिरातून प्रभावीपणे अधोरेखित झाला.
पांढरकवडा परिसरातील विविध धर्म व समाजातील युवकांनी कोणताही भेदभाव न करता रक्तदानासाठी पुढाकार घेतला. त्यामुळे या उपक्रमातून सामाजिक एकोपा, बंधुभाव आणि माणुसकीचे प्रेरणादायी दर्शन घडले.

पैगंबर मोहम्मद यांच्या मानवतावादी शिकवणीला रक्तदानाच्या माध्यमातून अभिवादन करण्याचा हा उपक्रम असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. १४२ युनिट रक्त संकलित झाल्याने अनेक गरजू रुग्णांना जीवनदान मिळण्यास मदत होणार असून, पांढरकवड्यातील या उपक्रमाने ‘सेवेतून सण’ साजरा करण्याचा आदर्श निर्माण केला आहे.









