⛔ ‘न समजलेले आई-बाप’ कार्यक्रमानंतर वेदिकाच्या घरी भेट; पुढील शिक्षणासाठी मदतीचा निर्धार
✍️पांढरकवडा : सफी खान
“मला बाप नाही, मी कोणाला मिठी मारू?” या दहावीतील विद्यार्थिनीच्या भावनिक उद्गाराने ‘न समजलेले आई-बाप’ या समाज प्रबोधनात्मक कार्यक्रमात उपस्थित पालक व विद्यार्थ्यांचे मन हेलावून गेले. कार्यक्रमानंतरही या विद्यार्थिनीची परिस्थिती लक्षात ठेवत युवा टायगर फोर्सच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी (ता. २७) तिच्या घरी जाऊन कुटुंबीयांची भेट घेतली. तिच्या पुढील शिक्षणासाठी आवश्यक ते सहकार्य करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
कु. वेदिका प्रेमानंद सोयाम ही इयत्ता दहावीत शिक्षण घेत असून शासकीय माध्यमिक आश्रम शाळा, कारेगाव बंडल येथे शिकत आहे. ‘न समजलेले आई-बाप’ कार्यक्रमादरम्यान तिने व्यक्त केलेल्या भावनांची दखल घेत युवा टायगर फोर्सच्या पदाधिकाऱ्यांनी तिच्याशी संपर्क साधला. त्यानंतर तिच्या मूळ गावी जाऊन आई, भाऊ, मोठी आई, मोठे बाबा तसेच गावातील नागरिकांच्या उपस्थितीत संवाद साधण्यात आला.
यावेळी वेदिकेच्या शिक्षणाबाबत तसेच कौटुंबिक परिस्थितीबाबत माहिती घेण्यात आली. तिला धीर देत “तू एकटी नाहीस, समाज तुझ्या पाठीशी आहे,” असा विश्वास देण्यात आला.

🎯 हंकारे यांच्या आवाहनाला कृतीची जोड
‘न समजलेले आई-बाप’ कार्यक्रमात प्रा. वसंत हंकारे यांनी वेदिकेच्या भावनांची दखल घेत, वडिलांची उणीव कोणीही भरून काढू शकत नसली तरी समाजातील माणसे तिच्या पाठीशी उभी राहू शकतात, असा संदेश दिला होता. या विचाराला प्रत्यक्ष कृतीची जोड देत युवा टायगर फोर्सच्या पदाधिकाऱ्यांनी तिच्या घरी भेट दिली.
युवा टायगर फोर्सचे संस्थापक अध्यक्ष मदन जिद्देवार यांनी वेदिकेशी संवाद साधून तिला आशीर्वाद व शुभेच्छा दिल्या.
«“वडिलांची उणीव कोणीही भरून काढू शकत नाही. मात्र तिच्या आयुष्याच्या प्रवासात आधार देणे ही समाजाची जबाबदारी आहे. वेदिकाने स्वतःला एकटे समजू नये. तिच्या शिक्षणासाठी आणि भविष्यासाठी युवा टायगर फोर्स कुटुंबाप्रमाणे तिच्या पाठीशी राहील.”»
— मदन जिद्देवार, संस्थापक अध्यक्ष, युवा टायगर फोर्स
🎯 शिक्षणात अडथळे येऊ नयेत
वेदिकाच्या पुढील शिक्षणात आर्थिक अथवा अन्य अडथळे येऊ नयेत, यासाठी आवश्यक ते सहकार्य करण्याचा निर्धार युवा टायगर फोर्सने व्यक्त केला. तिच्या शैक्षणिक प्रवासाला सातत्याने मदत करण्याची भूमिका यावेळी घेण्यात आली.
या वेळी माजी सरपंच शंकर कुमरे, दिलीप मेश्राम, व्यंकटे रेड्डी, महादेव रेड्डी सामावार ,स्वामी सरलावार, नंदकुमार सोयाम, पंचायत समितीचे माजी सभापती रितेश परचाके, राहुल भानेगावकर, श्री जगदंबा संस्थान, केळापूरचे अध्यक्ष शंकर बडे, नायब तहसीलदार राजू मोटेमवार, वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय तोडासे, मनोज भोयर आदी उपस्थित होते.
युवा टायगर फोर्सचे अंकित नैताम, संजय झोटिंग, गणेश बोरकुटे, सुनील कोपुलवार, राम जिद्देवार, संतोष सिंह सेंगर, प्रदीप अग्रवाल यांच्यासह पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

🎯 आश्वासनापेक्षा कृती महत्त्वाची
सार्वजनिक कार्यक्रमात विद्यार्थिनीने व्यक्त केलेली वेदना कार्यक्रमापुरती मर्यादित न राहता तिच्या घरापर्यंत पोहोचलेल्या मदतीच्या रूपाने पुढे आली. वेदिकाच्या शिक्षणासाठी आणि भविष्यासाठी मदतीचा हात देण्याचा युवा टायगर फोर्सचा निर्णय सामाजिक बांधिलकीचा संदेश देणारा ठरला आहे.
कार्यक्रमाच्या व्यासपीठावर उमटलेली एका विद्यार्थिनीची आर्त हाक आणि त्यानंतर तिच्या घरी पोहोचलेला आधाराचा हात, यामुळे ‘न समजलेले आई-बाप’ या उपक्रमाला सामाजिक कृतीची जोड मिळाली आहे.









