ब्रेकिंग पांढरकवडा वणी क्रिकेट संपादकीय मनोरंजन नौकरी सामाजिक विशेष देश विदेश आध्यात्मिक इतर

युवा टायगर फोर्सच्या पाठपुराव्याला यश; पांढरकवडा उपजिल्हा रुग्णालयात तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्याची नियुक्ती

On: August 30, 2026 1:28 PM
Follow Us:
---Advertisement---

३० जुलैच्या मागणीची आरोग्य विभागाकडून दखल; डॉ. शेखर दोरखंडे यांची नियुक्ती — रिक्त पदे व सुविधांसाठी पाठपुरावा सुरूच

✍️पांढरकवडा | सफी खान

पांढरकवडा उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय सुविधांचा प्रश्न ऐरणीवर आणत तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याची मागणी करणाऱ्या युवा टायगर फोर्सच्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे. ३० जुलै २०२६ रोजी आरोग्य उपसंचालक, अकोला यांच्याकडे करण्यात आलेल्या मागणीची दखल घेत आरोग्य विभागाने MBBS, MD (Medicine) डॉ. शेखर दोरखंडे यांची पांढरकवडा उपजिल्हा रुग्णालयात तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे.

पांढरकवडा शहरासह परिसरातील नागरिकांना गंभीर आजारांच्या उपचारासाठी यवतमाळ, नागपूर किंवा इतर शहरांकडे धाव घ्यावी लागू नये, तसेच उपजिल्हा रुग्णालयातच आवश्यक तज्ज्ञ वैद्यकीय सेवा उपलब्ध व्हावी, यासाठी युवा टायगर फोर्सकडून सातत्याने पाठपुरावा करण्यात येत होता. विशेषतः फोर्सचे पदाधिकारी संजय झोटिंग यांनी तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या नियुक्तीचा मुद्दा सातत्याने लावून धरला होता.

🎯 ३० जुलैला आरोग्य विभागाकडे निवेदन

युवा टायगर फोर्सचे संस्थापक अध्यक्ष मदन जिद्देवार यांनी ३० जुलै रोजी आरोग्य उपसंचालक, अकोला डॉ. सुशील वाकचौरे यांच्याकडे पांढरकवडा उपजिल्हा रुग्णालयातील रिक्त पदे तातडीने भरण्यात यावीत, तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी आणि रुग्णालयात आवश्यक त्या सर्व वैद्यकीय सोयी-सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी केली होती.

यावेळी युवा टायगर फोर्सचे संयोजक अंकित नैताम, गणेश बोरकुटे, संजय आत्राम आणि वाजिद कुरेशी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

🎯 नागरिकांना मिळणार मोठा दिलासा

आरोग्य विभागाने या मागणीची दखल घेत डॉ. शेखर दोरखंडे यांची तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी म्हणून नियुक्ती केल्याने पांढरकवडा व परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. उपजिल्हा रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध झाल्याने रुग्णांना वेळेत उपचार मिळण्यास मदत होणार असून, गंभीर स्वरूपाच्या आजारांसाठी इतर शहरांवर अवलंबून राहण्याची गरज काही प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा आहे.

दरम्यान, उपजिल्हा रुग्णालयातील इतर रिक्त पदे तातडीने भरण्यासह आवश्यक वैद्यकीय उपकरणे व सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणीही युवा टायगर फोर्सने कायम ठेवली आहे.

“जनतेच्या आरोग्याशी संबंधित प्रश्नासाठी केलेल्या मागणीला मिळालेले हे यश आहे. मात्र, रुग्णालयातील उर्वरित रिक्त पदे तातडीने भरण्यात यावीत आणि नागरिकांना आवश्यक त्या सर्व वैद्यकीय सुविधा मिळाव्यात, यासाठी युवा टायगर फोर्सचा पाठपुरावा यापुढेही सुरूच राहील,” अशी भूमिका फोर्सच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्याची नियुक्ती झाल्याने जनहिताच्या मागणीला मिळालेले हे महत्त्वाचे यश असल्याचे युवा टायगर फोर्सच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment