⛔ ॲड. मुत्यालवार क्रिकेट क्लबच्या निवेदनाची तातडीने दखल; सरावासाठी मैदान लवकर उपलब्ध करून देण्याची मागणी
✍️पांढरकवडा : सफी खान
येथील तालुका क्रीडा संकुलाच्या मैदानाचे काम संथ गतीने सुरू असल्याने क्रिकेट खेळाडू व क्रीडाप्रेमींना सरावासाठी अडचणी निर्माण होत आहेत. मैदानाचे काम जलद गतीने पूर्ण करून ते लवकरात लवकर सरावासाठी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी ॲड. मुत्यालवार क्रिकेट क्लब, पांढरकवडा यांच्या वतीने आमदार तथा तालुका क्रीडा संकुलाचे अध्यक्ष राजू तोडसाम यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.

या निवेदनाची आमदार राजू तोडसाम यांनी तातडीने तत्काळ दखल घेतली. त्यांनी संबंधित तालुका क्रीडा अधिकारी तसेच कंत्राटदाराशी दूरध्वनीवरून संपर्क साधून मैदानाच्या कामात होत असलेल्या विलंबाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच मैदानाचे काम अधिक वेगाने करून लवकरात लवकर पूर्ण करावे आणि खेळाडूंना सरावासाठी मैदान उपलब्ध करून द्यावे, अशा स्पष्ट सूचना संबंधितांना दिल्या.
तालुका क्रीडा संकुलाचे मैदान हे परिसरातील क्रिकेटपटू तसेच विविध क्रीडा प्रकारातील खेळाडूंसाठी महत्त्वाचे आहे. मात्र, काम संथ गतीने सुरू असल्याने नियमित सरावावर परिणाम होत आहे. त्यामुळे आमदारांच्या निर्देशानंतर आता मैदानाचे काम वेगाने पूर्ण होऊन ते प्रत्यक्ष सरावासाठी कधी उपलब्ध होते, याकडे क्रीडाप्रेमी, खेळाडू आणि क्रिकेट रसिकांचे लक्ष लागले आहे.

यावेळी ॲड. मुत्यालवार क्रिकेट क्लब, पांढरकवडाचे अध्यक्ष ॲड. के.जी.मुत्यालवार, उपाध्यक्ष विजय कोंडावार, सचिव ताडपेल्लीवार, डॉ. नीलमवार तसेच क्लबचे सदस्य उपस्थित होते.









