ब्रेकिंग पांढरकवडा वणी क्रिकेट संपादकीय मनोरंजन नौकरी सामाजिक विशेष देश विदेश आध्यात्मिक इतर

निष्काम कर्मयोगाची वाट चालणारे सेवाव्रती विजयबाबू चोरडिया

On: September 4, 2026 2:11 AM
Follow Us:
---Advertisement---

शिक्षण, व्यवसाय, राजकारण आणि समाजसेवेचा अनोखा संगम; ३५० विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व ते बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कारापर्यंत अविरत सेवाकार्य

✍️वणी | महेश टिपले

एखाद्या समस्येकडे केवळ समस्या म्हणून न पाहता तिच्या मुळाशी जाऊन तिच्यावर कायमस्वरूपी तोडगा शोधणे, गरजूंच्या मदतीला धावून जाणे आणि समाजहितासाठी सातत्याने कार्यरत राहणे, ही सेवाव्रती विजयबाबू चोरडिया यांच्या कार्याची ओळख आहे. शिक्षण, व्यवसाय, राजकारण आणि समाजकारण या विविध क्षेत्रांत कार्यरत असतानाही सामान्य माणसाशी असलेली त्यांची नाळ आजही तितकीच घट्ट आहे. शांत स्वभाव, सूक्ष्म निरीक्षण, सखोल अभ्यास आणि अन्यायाविरुद्धची आक्रमक भूमिका यामुळे वणी परिसरात त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

औषधीनिर्माणशास्त्रातील बी. फार्म. पदवी घेतल्यानंतर विजयबाबूंचा शैक्षणिक प्रवास समाजकारणाकडे वळला. त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर घरातील सामाजिक संस्कारांचा मोठा प्रभाव आहे. त्यांचे आजोबा प्रेमराजजी चोरडिया हे महात्मा गांधींचे अनुयायी होते. सन १९३२ मध्ये महात्मा गांधी वणीला आले असताना त्यांना गांधीजींचा प्रदीर्घ सहवास लाभला होता. प्रेमराजजी यांनी वणी नगरपालिकेचे उपाध्यक्षपदही भूषविले. वडील पारसमलजी हे व्यापारी असले तरी सामाजिक कार्यात त्यांचे भरीव योगदान होते. या संस्कारांतूनच विजयबाबूंच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण झाली.

🎯 अन्यायाविरुद्ध आक्रमक, मात्र स्वभावाने संयमी

विजयबाबू अत्यंत संवेदनशील व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात. कोणावर अन्याय किंवा अत्याचार झाल्याचे त्यांना आजही सहन होत नाही. एखादा प्रश्न हाती घेण्यापूर्वी त्याचा बारकाईने अभ्यास करणे आणि प्रश्न सुटेपर्यंत सातत्याने पाठपुरावा करणे, ही त्यांची कार्यपद्धती आहे.

‘डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर’ हा त्यांचा स्वभावगुण त्यांच्या कार्यात प्रकर्षाने जाणवतो. त्यामुळे वरिष्ठांपासून सामान्य कार्यकर्त्यांपर्यंत सर्वांमध्ये त्यांच्याबद्दल आपुलकी आणि आदर आहे. एरवी शांत आणि संयमी दिसणारे विजयबाबू अन्यायाच्या प्रश्नावर मात्र तितक्याच ताकदीने आवाज उठवतात.

वणी परिसर कोळसा खाणींनी व्यापलेला असल्याने येथील कामगारांच्या विविध समस्या सातत्याने समोर येत असतात. या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी त्यांनी अनेकदा प्रशासनाचे लक्ष वेधले.

🎯 गाडगेबाबांच्या विचारांचा सेवेतून जागर

कर्मयोगी संत गाडगेबाबांच्या दशसूत्रींवर विजयबाबूंची नितांत श्रद्धा आहे. ही श्रद्धा केवळ विचारांपुरती मर्यादित न ठेवता त्यांनी ती प्रत्यक्ष कृतीत उतरवली आहे. दरवर्षी उन्हाळ्यात व्यक्तिगत पातळीवर पाणपोई सुरू करून तहानलेल्या नागरिकांसाठी पाण्याची व्यवस्था केली जाते.

सामान्य आणि गरजू कुटुंबांसाठी सामूहिक विवाह मेळाव्यांचे आयोजन, सहभागी जोडप्यांना वैयक्तिक भेटवस्तू, मंदिर परिसरात स्वच्छतागृहाची उभारणी अशा विविध उपक्रमांतून त्यांची समाजसेवेची धडपड दिसून येते. वणीतील जैताई मंदिर परिसरात त्यांनी स्वखर्चाने स्वच्छतागृह बांधून दिले. एखादी समस्या त्यांच्या निदर्शनास आली की तिच्या निवारणासाठी ते तातडीने पुढाकार घेतात.

🎯 अपघाती प्रवेशातून राजकारणात सक्रिय वाटचाल

विजयबाबूंचा राजकारणातील प्रवेशही काहीसा अनपेक्षित होता. शहर काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदाच्या नियुक्तीपत्रावर थोरल्या भावाऐवजी चुकून विजयबाबूंचे नाव आले. मात्र आलेली जबाबदारी त्यांनी संधी मानून समर्थपणे पार पाडली.

सन २००० मध्ये ते जेसीजशी जोडले गेले आणि अवघ्या दोन वर्षांत त्यांच्यावर अध्यक्षपदाची जबाबदारी आली. सन २००४ मध्ये त्यांनी भारतीय जैन संघटनेचे अध्यक्षपद भूषविले. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष, कोलवॉशरी वर्कर्स युनियन महाराष्ट्राचे अध्यक्ष, रामलाठी आखाड्याचे सल्लागार, बुलढाणा अर्बन क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे संचालक अशा विविध जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या.

सन २०१६ मध्ये माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. पुढे प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य म्हणूनही त्यांनी काम केले. राजकारणात सक्रिय असतानाही नैतिकता आणि सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न त्यांनी कायम केला. त्यामुळे राजकीय विरोधकांमध्येही त्यांच्याबद्दल आदराचे स्थान आहे.

🎯 आरोग्यसेवेतून गरजूंच्या जीवनाला आधार

वणी परिसरातील आरोग्याच्या प्रश्नांबाबत विजयबाबू विशेष गंभीर असतात. विविध आरोग्य शिबिरांचे आयोजन करून गरजू रुग्णांना उपचाराची सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच त्यांच्या निवास, भोजन, औषधोपचार आणि उपचारांचा खर्चही ते अनेकदा उचलतात.

अपंग व्यक्तींना तीनचाकी सायकली, कर्णबधिरांना श्रवणयंत्रे तसेच मोठ्या शस्त्रक्रियांसाठी गरजू रुग्णांना आर्थिक मदत करण्याचे काम त्यांनी केले आहे. आरोग्यसेवेच्या या उपक्रमांना केवळ कार्यक्रमाचे स्वरूप न देता गरजू व्यक्तीला प्रत्यक्ष मदत मिळेल, यावर त्यांचा भर असतो.

कोरोना महामारीच्या काळातही त्यांनी अनेक गरजू नागरिकांना मदतीचा हात दिला. कोरोना योद्ध्यांचा सन्मान करताना त्यांना आर्थिक मदतही केली.

🎯 ३५० विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व

समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी विजयबाबूंनी विशेष पुढाकार घेतला आहे. आतापर्यंत ३५० विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व त्यांनी स्वीकारले आहे. शिक्षणाच्या माध्यमातून गरजू विद्यार्थ्यांना उभे करण्याचा त्यांचा हा उपक्रम त्यांच्या सेवाभावी कार्यातील महत्त्वाचा टप्पा मानला जातो.

अनोळखी आणि बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठीही ते पुढाकार घेतात. पुराच्या काळात एनडीआरएफची चमू वणीला आली असता त्यांच्या निवास, भोजन आणि अन्य व्यवस्थेची जबाबदारीही त्यांनी पार पाडली होती.

🎯 धार्मिक-सामाजिक उपक्रमांमध्येही सक्रिय

जैताई देवस्थान, रंगनाथ स्वामी मंदिर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील दुर्गा मंदिर, जंगलाचा मारुती मंदिर, अमृत भवन हनुमान मंदिर तसेच कोलगाव येथील संत जगन्नाथ महाराज मंदिर यांना त्यांनी भरीव मदत केली आहे. भांदेवाडा येथील संत जगन्नाथ महाराजांच्या दमणीसाठी त्यांनी २२ किलो चांदी अर्पण केली.

🎯 श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सवही सेवाकार्याशी जोडला

श्रीकृष्ण जन्माष्टमी चारिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष म्हणून विजयबाबूंच्या नेतृत्वाखाली जन्माष्टमी उत्सव नियोजनबद्ध पद्धतीने साजरा केला जातो. यंदाही विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

🎯 बहुआयामी व्यक्तिमत्त्वाची ओळख

समाजसेवेबरोबरच विजयबाबूंच्या व्यक्तिमत्त्वाला विविध छंदांचीही जोड आहे. बुद्धिबळ आणि क्रिकेट हे त्यांचे आवडते खेळ. कामाचा व्याप वाढल्याने या छंदांसाठी वेळ कमी मिळत असला तरी वाचन आणि संगीत ऐकण्याची आवड त्यांनी आजही जपली आहे. ज्ञानी आणि गुणी व्यक्तींचे ते मनापासून कौतुक करतात.

कामगार आणि शेतकऱ्यांविषयी त्यांना विशेष जिव्हाळा आहे. वर्षभर काही ना काही सामाजिक, धार्मिक किंवा सेवाभावी उपक्रम राबवत राहणे हीच त्यांच्या कार्याची खासियत आहे.

तिथीनुसार श्रीकृष्ण जन्माष्टमी हा त्यांचा जन्मदिवस. भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेल्या निष्काम कर्मयोगाचा विचार आपल्या आचरणातून जपण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. प्रसिद्धीपेक्षा कामाला आणि राजकारणापेक्षा समाजकारणाला अधिक महत्त्व देत सर्वांना सोबत घेऊन पुढे जाणारे विजयबाबू चोरडिया यांचा प्रवास म्हणूनच अनेकांसाठी प्रेरणादायी ठरतो.

४ सप्टेंबर या जन्मदिवसानिमित्त विजयबाबू चोरडिया यांना निरोगी, दीर्घायुषी आणि यशस्वी सामाजिक-राजकीय वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment