ब्रेकिंग पांढरकवडा वणी क्रिकेट संपादकीय मनोरंजन नौकरी सामाजिक विशेष देश विदेश आध्यात्मिक इतर

पालक-शिक्षक सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद; ४१० हून अधिक पालकांची उपस्थिती

On: September 4, 2026 4:09 AM
Follow Us:
---Advertisement---

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा सविस्तर आढावा; उत्तरपत्रिका, लेखनशैली व विषयवार कामगिरीवर मार्गदर्शन

✍️वणी : महेश टिपले


वणी लायन्स इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या नांदेपेरा रोड येथील शाळेच्या इमारतीत इयत्ता ६ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित पालक-शिक्षक सभा उत्साहपूर्ण व शैक्षणिक वातावरणात यशस्वीरीत्या पार पडली. या सभेला पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून ४१० हून अधिक पालकांनी उपस्थित राहून आपल्या पाल्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेत शिक्षकांशी प्रत्यक्ष संवाद साधला.

या पालक-शिक्षक सभेदरम्यान विद्यार्थ्यांच्या प्रथम घटक चाचणीतील निकाल, विषयवार कामगिरी, लेखनशैली, उत्तरपत्रिकेची मांडणी, अभ्यासातील अडचणी तसेच विद्यार्थ्यांनी केलेल्या चुका याबाबत शिक्षकांनी पालकांशी सविस्तर चर्चा केली. विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती अधिक प्रभावीपणे कशी साधता येईल, याबाबतही पालकांना आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी पालकांनी आपल्या पाल्यांच्या प्रगतीबाबत मौल्यवान अभिप्राय व उपयुक्त सूचना दिल्या.

संस्थेचे मा. लायन संजीव रेड्डी बोदकुरवार यांनी प्रत्येक वर्गाला भेट देऊन पालकांशी संवाद साधला. त्यांनी विद्यार्थ्यांच्या विविध विषयांच्या उत्तरपत्रिका स्वतः पाहून अक्षर, उत्तर लिहिण्याची पद्धत, विषयाची मांडणी तसेच प्रथम घटक चाचणीतील गुणांचे कौतुक केले. विद्यार्थ्यांनी केलेल्या चांगल्या कामगिरीचे त्यांनी विशेष कौतुक करत त्यांना पुढील परीक्षांमध्ये आणखी उत्तम कामगिरी करण्यासाठी प्रोत्साहन दिले.

विद्यार्थ्यांना अभ्यासादरम्यान येणाऱ्या अडचणी तसेच परीक्षेत झालेल्या चुका शिक्षकांच्या मार्गदर्शनातून दूर करून अधिक चांगली शैक्षणिक कामगिरी करण्यासाठी आणि आगामी परीक्षांमध्ये अधिकाधिक गुण मिळविण्यासाठी आवश्यक सूचना व मार्गदर्शनही करण्यात आले.

यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. चित्रा देशपांडे यांनी पालक व शिक्षक यांच्यातील प्रभावी समन्वयाचे महत्त्व अधोरेखित केले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी शाळा आणि पालकांनी परस्पर सहकार्याने सातत्यपूर्ण प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासोबतच शाळेच्या सर्वांगीण प्रगतीसाठी मा. लायन संजीव रेड्डी बोदकुरवार तसेच मा. लायन बलदेव खुँगर यांनी शिक्षकांना मौल्यवान मार्गदर्शन व महत्त्वपूर्ण सूचना दिल्या.

पालक, शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील संवाद व समन्वय अधिक दृढ करणारी ही पालक-शिक्षक सभा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी आणि सर्वांगीण विकासासाठी निश्चितच उपयुक्त ठरली. विद्यार्थ्यांची सातत्यपूर्ण प्रगती, गुणवत्तापूर्ण शिक्षण, उत्तम शैक्षणिक वातावरण आणि उज्ज्वल भविष्य घडविणे हेच शाळेचे प्रमुख ध्येय असल्याचे या सभेत अधोरेखित झाले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment