ब्रेकिंग पांढरकवडा वणी क्रिकेट संपादकीय मनोरंजन नौकरी सामाजिक विशेष देश विदेश आध्यात्मिक इतर

रक्षाबंधनाच्या स्नेहधाग्यातून समाजसेवेची बांधिलकी मजबूत करा

On: September 2, 2026 12:58 AM
Follow Us:
---Advertisement---

सौ. किरण देरकर यांचे शिवसेना उबाठाच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांना आवाहन; सामाजिक उपक्रमांना गती देण्याचा संकल्प

✍️वणी | महेश टिपले :


रक्षाबंधनाच्या स्नेहबंधाला सामाजिक बांधिलकी आणि संघटनात्मक एकजुटीची जोड देत समाजातील प्रत्येक घटकाच्या सुख-दुःखात सहभागी व्हा, असे आवाहन सन्मान स्त्री शक्ती फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ. किरण देरकर यांनी केले. राखी पौर्णिमेनिमित्त त्यांच्या पुढाकाराने वणी येथे आयोजित रक्षाबंधन सोहळ्यात त्या बोलत होत्या.

या सोहळ्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या पुरुष व महिला पदाधिकाऱ्यांना भेटवस्तू देत राखी बांधण्यात आली. स्नेह, आपुलकी आणि विश्वासाचे नाते अधिक दृढ करणाऱ्या या उपक्रमामुळे पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

यावेळी बोलताना सौ. किरण देरकर म्हणाल्या की, रक्षाबंधन हा केवळ भाऊ-बहिणीच्या नात्याचा सण नसून परस्पर विश्वास, संरक्षण, जबाबदारी आणि आपुलकीचा स्नेहबंध दृढ करणारा दिवस आहे. पक्षातील प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्ता हा कुटुंबातील सदस्याप्रमाणे असून, एकमेकांच्या सुख-दुःखात सहभागी होण्याची भावना संघटनेत कायम राहिली पाहिजे.

पक्षाचे संघटन केवळ राजकीय कार्यक्रमांपुरते मर्यादित न ठेवता समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविणे गरजेचे आहे. आपल्या परिसरातील नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

महिला सक्षमीकरण, विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत, आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिरे, वृक्षारोपण, पर्यावरण संवर्धन, गरजू नागरिकांना मदत, ज्येष्ठ नागरिकांसाठी उपक्रम, स्वच्छता अभियान तसेच रोजगार व मार्गदर्शन शिबिरे यांसारखे समाजोपयोगी उपक्रम पक्षाच्या माध्यमातून सातत्याने राबविण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

समाज अडचणीत असताना नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे हीच खरी सामाजिक बांधिलकी आहे. प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्त्याने आपल्या भागात समाजोपयोगी कार्याची स्वतंत्र ओळख निर्माण करावी, असेही त्यांनी सांगितले.

रक्षाबंधनाच्या स्नेहधाग्याला संघटनात्मक एकजुटीशी जोडत बूथपासून गावपातळीपर्यंत पक्षाचे संघटन अधिक मजबूत करण्यासाठी सर्वांनी एकदिलाने काम करावे, असे आवाहन त्यांनी केले. पक्षाची विचारधारा, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा संदेश आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी लढण्याची भूमिका तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने सक्रिय राहावे, असेही त्यांनी नमूद केले.

दरम्यान, शिवसेना उबाठाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी आमदार संजय देरकर यांना राखी बांधून रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या. सण-उत्सव केवळ आनंद साजरा करण्याचे निमित्त न राहता त्यातून समाजाशी असलेले नाते अधिक घट्ट व्हावे, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

या कार्यक्रमास संजय निखाडे, गणपत लेडांगे, सुधीर थेरे, सुनील कातकडे, संतोष कुचनकर, पुरुषोत्तम बुट्टे, विनोद दुमणे, महेश सोमलकर, तुलसी तेवर यांच्यासह महिला जिल्हाप्रमुख सौ. डिमनताई टोंगे, शिवसेना ज्येष्ठ नेत्या व माजी जिल्हाप्रमुख तथा सरपंच सौ. गीताताई उपरे, महिला तालुकाप्रमुख वणी सौ. सुरेखाताई ढेंगळे, महिला तालुकाप्रमुख मारेगाव सौ. इंदूताई किन्हेकार, महिला तालुका सचिव सौ. पौर्णिमाताई राजुरकर, तालुका संपर्कप्रमुख झरी सौ. ममताताई पारखी, पंचायत समिती सर्कलप्रमुख सौ. छबुताई आसूटकर, अमीनाजी पठाण, महिला शहरप्रमुख सौ. सविताताई गुलाबराव आवारी, माजी पंचायत समिती सदस्य सौ. चंदाताई मुन, माजी नगरसेविका सौ. कीर्तीताई देशकर, नगरसेविका वर्षाताई किंगरे, नगरसेविका सौ. कांचनताई देरकर, सौ. प्रणाली ताई देवाळकर, ग्रामपंचायत सदस्य सौ. वैशालीताई देठे, माजी नगरसेविका सौ. जिजाताई वरारकर, सामाजिक कार्यकर्त्या सौ. वेणूताई झोडे, सौ. मंजूताई इनामे, वर्षाताई पोटे यांच्यासह शिवसेना उबाठाचे पुरुष व महिला पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रक्षाबंधनाच्या स्नेहबंधातून संघटनात्मक एकजूट, सामाजिक बांधिलकी आणि सेवाभावाची त्रिसूत्री अधिक बळकट करण्याचा संकल्प या उपक्रमातून करण्यात आला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment