⛔ केळापूर येथील जगदंबा संस्थानात १५ गावांतील ज्येष्ठ नागरिकांचा सहभाग; आरोग्य शिबिरात १९० ज्येष्ठांची तपासणी, ३४ आयुष्मान कार्डांसाठी प्रक्रिया
✍️पांढरकवडा : अशफाक खान
ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या, हक्क तसेच विविध शासकीय योजनांची माहिती व मार्गदर्शन मिळावे, या उद्देशाने जनसेवा ग्रामीण विकास व शिक्षण प्रतिष्ठानच्या वतीने पांढरकवडा तालुक्यातील १५ गावांतील ज्येष्ठ नागरिकांचे वार्षिक संमेलन बुधवार, दि. २ सप्टेंबर २०२६ रोजी जगदंबा संस्थान, केळापूर येथे उत्साहात पार पडले.
कार्यक्रमाचे उद्घाटन ज्येष्ठ नागरिक श्रीमती लक्ष्मी गजानन पेटकुले यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जगदंबा संस्थान, केळापूरचे अध्यक्ष श्री. शंकर बडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून गट विकास अधिकारी श्री. मधुकर मुंडे, नायब तहसीलदार श्री. राजू मोट्टेमवार, सहायक पोलीस निरीक्षक श्री. सागर पेंढारकर, ॲड. अनिल किनाके, श्री. मनोज भोयर अध्यक्ष, जनसेवा ग्रामीण विकास व शिक्षण प्रतिष्ठान, श्री. विजय पाटील तसेच जगदंबा संस्थानचे उपाध्यक्ष श्री. काशीनाथ शिंदे उपस्थित होते. प्रकल्प व्यवस्थापक डॉ. सोनल फाळके यांनी प्रास्ताविकातून संस्थेच्या उपक्रमांची व ज्येष्ठ नागरिकांसाठी राबविण्यात येणाऱ्या सेवांची माहिती दिली.

यावेळी नायब तहसीलदार श्री. राजू मोट्टेमवार यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या विविध समस्या तसेच समाजकल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या शासकीय योजनांची सविस्तर माहिती देत मार्गदर्शन केले. ॲड. अनिल किनाके यांनी ज्येष्ठ नागरिकांचे कायदेशीर हक्क, त्यांच्यासाठी उपलब्ध असलेले कायदे आणि कायदेविषयक मदतीच्या सुविधांबाबत मार्गदर्शन केले. अध्यक्षीय भाषणातून श्री. शंकर बडे यांनी ज्येष्ठ नागरिकांचा जीवनानुभव, समाजातील योगदान आणि त्यांच्या सन्मानाचे महत्त्व अधोरेखित केले.
संमेलनात ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला. Activity Centre मध्ये ज्येष्ठ नागरिकांनी स्वतः तयार केलेल्या राख्या मान्यवरांना बांधून त्यांचा सन्मान केला. स्वयंसेवकांनी स्वागतगीत सादर केले. त्यानंतर ज्येष्ठ नागरिकांनी भजन, गाणी तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली. यावेळी ज्येष्ठ नागरिकांनी प्रकल्पाच्या माध्यमातून मिळणाऱ्या विविध सेवांबाबत आपले मनोगत व्यक्त करत समाधान व्यक्त केले.
🎯 आरोग्य शिबिरात १९० ज्येष्ठांची तपासणी
संमेलनाच्या निमित्ताने आयोजित आरोग्य शिबिरात १९० ज्येष्ठ नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. तपासणीनंतर आवश्यक औषधे मोफत देण्यात आली. तसेच ३४ ज्येष्ठ नागरिकांच्या आयुष्मान कार्डासाठी प्रक्रिया करण्यात आली, तर ५७ ज्येष्ठ नागरिकांना संजय गांधी निराधार योजनेची माहिती देऊन त्यांचे अर्ज करण्यात आले. या उपक्रमामुळे ज्येष्ठ नागरिकांना आरोग्यसेवा तसेच शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी महत्त्वपूर्ण मदत झाली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल वनकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन शम्मी शेख यांनी केले. संमेलनाच्या यशस्वी आयोजनासाठी पूजा चव्हाण, डॉ. सोनल फाळके, शम्मी शेख, संतोष पिंगळे, राहुल वनकर आणि नितीश कुंटावार यांनी परिश्रम घेतले.
ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देतानाच आरोग्य, सामाजिक सुरक्षा आणि शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याच्या दृष्टीने हे संमेलन उपयुक्त ठरले.









