⛔ नव्या कार्यकारिणीची घोषणा; शोभायात्रा, सांस्कृतिक कार्यक्रमांनी रंगला उत्सव — नवविवाहित दाम्पत्यांसह गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव
✍️वणी : महेश टिपले
‘संघटन में ही शक्ति है’ या भावनेला अधोरेखित करत क्षत्रिय छिपा समाज महिला समिती, वणीच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘भूजलिया उत्सव-२०२६’ उत्साहपूर्ण वातावरणात, पारंपरिक पद्धतीने व थाटामाटात साजरा करण्यात आला. समाजातील ज्येष्ठ नागरिक, युवक-युवती, महिला तसेच बालकांच्या मोठ्या सहभागामुळे उत्सवाला सामाजिक एकजूट, उत्साह आणि बांधिलकीचे स्वरूप प्राप्त झाले.
🎯 भव्य शोभायात्रेने उत्सवाची सुरुवात
उत्सवाची सुरुवात समाज बांधवांच्या भव्य शोभायात्रेने करण्यात आली. पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेल्या समाज बांधवांनी शोभायात्रेची शोभा वाढविली. उत्साहपूर्ण वातावरणात निघालेल्या या शोभायात्रेनंतर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
महिला व बालकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपल्या विविध कलागुणांचे सादरीकरण केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. राखी श्याम बडघरे व सौ. प्रीती पंकज बिलोरीया यांनी प्रभावीपणे केले. ओघवत्या निवेदनातून त्यांनी कार्यक्रमात रंगत आणली.

🎯 नवविवाहित दाम्पत्यांचा पारंपरिक सत्कार
समाजाच्या परंपरेनुसार नुकतेच विवाहबद्ध झालेल्या नवविवाहित दाम्पत्यांचा तिलक, शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. उपस्थित समाज बांधवांनी नवदाम्पत्यांना सुखी, समृद्ध व आनंदी वैवाहिक जीवनासाठी शुभेच्छा दिल्या.
महिलांच्या उत्साहाला तसेच त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘सावन की रानी’ आणि ‘भूजलिया स्पर्धे’चे आयोजन करण्यात आले. या दोन्ही उपक्रमांना महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
🎯 दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव
शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या दहावी उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या माध्यमातून समाजाच्या प्रगतीत योगदान द्यावे आणि भविष्यात यशाची नवी शिखरे गाठावीत, या उद्देशाने त्यांना प्रोत्साहन देण्यात आले.
🎯 राजाभाऊ उर्फ महादेव बिलोरीया यांची अध्यक्षपदी निवड
भूजलिया उत्सवाच्या निमित्ताने क्षत्रिय छिपा समाजाच्या संघटनात्मक वाटचालीतील महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. समाजाच्या सर्वसंमतीने श्री. राजाभाऊ उर्फ महादेव गणपत बिलोरीया यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीचे समाज बांधवांनी ढोल-ताशांच्या गजरात व पुष्पहारांनी उत्साहात स्वागत केले.
नवनियुक्त अध्यक्ष राजाभाऊ बिलोरीया यांनी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी नव्या कार्यकारिणीची घोषणा केली.

🎯 नवी कार्यकारिणी अशी :
- अध्यक्ष — राजाभाऊ उर्फ महादेव गणपत बिलोरीया
- उपाध्यक्ष — सुभाषजी केशव बिलोरीया
- सचिव — जयजी राजेश चुरे
- सहसचिव — प्रज्योतजी वैद्य
- कोषाध्यक्ष — अशोकजी बिलोरीया
- कार्याध्यक्ष — रमेशजी गणपतराव बिलोरीया
🔺कार्यकारिणी सदस्य : दिगंबरजी मुजारीया, सरोजजी वैद्य, अनिलजी बिलोरीया, विशालजी बिलोरीया व नितीनजी चुरे.
🔺महिला अध्यक्षा — सौ. ज्योती सुभाष बिलोरीया.
🎯 सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक विकासाचा संकल्प
नव्या कार्यकारिणीच्या माध्यमातून समाजाच्या विकासाला नवी दिशा देण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रात विविध उपक्रम राबविण्यावर भर देण्यात येणार असल्याचे नवनियुक्त पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
नवनियुक्त अध्यक्षांसह सर्व पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्यांचे समाज बांधवांनी अभिनंदन केले. नव्या नेतृत्वाखाली क्षत्रिय छिपा समाज अधिक संघटित होऊन सामाजिक एकजुटीचे नवे आदर्श निर्माण करेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.
🎯 मान्यवरांची उपस्थिती
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. राजाभाऊ गणपतराव बिलोरीया होते. मंचावर श्री. सुभाष केशव बिलोरीया, श्री. जय राजेश चुरे, श्री. रमेश गणपतराव बिलोरीया व सौ. ज्योती सुभाष बिलोरीया यांची प्रमुख उपस्थिती होती.
🎯 मातृशक्तीसह सर्व समाज बांधवांचे आभार
कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी सौ. शीतल सचिन मुजारिया यांनी आभार प्रदर्शन केले. उत्सव यशस्वी करण्यासाठी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे सहकार्य करणाऱ्या सर्व समाज बांधव, युवक, ज्येष्ठ नागरिक तसेच विशेषतः कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी परिश्रम घेणाऱ्या मातृशक्तीचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.
एकजुटीचा संदेश देत उत्साहपूर्ण वातावरणात ‘भूजलिया उत्सव-२०२६’ची सांगता झाली.










