ब्रेकिंग पांढरकवडा वणी क्रिकेट संपादकीय मनोरंजन नौकरी सामाजिक विशेष देश विदेश आध्यात्मिक इतर

पाच तासांत चोरीचा छडा! कॅनाल साईटवरील ८० हजारांचा टँकर हस्तगत; तिघे ताब्यात

On: September 25, 2026 7:18 PM
Follow Us:
---Advertisement---

⛔ पांढरकवडा पोलिसांची धडाकेबाज कारवाई; चोरीसाठी वापरलेले पाच लाखांचे ट्रॅक्टरही जप्त

✍️पांढरकवडा: अशफाक खान


केळापूर तालुक्यातील चिखलधरा गावात कॅनाल बांधकामाच्या साईटवर ठेवण्यात आलेला सुमारे ८० हजार रुपये किमतीचा निळ्या रंगाचा लोखंडी टँकर चोरीला गेल्याची घटना समोर आल्यानंतर पांढरकवडा पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवून अवघ्या पाच तासांत चोरीचा छडा लावला. या प्रकरणात पोलिसांनी तिघांना ताब्यात घेत चोरीस गेलेला टँकर हस्तगत केला असून, चोरीसाठी वापरल्याचे सांगितलेले महिंद्रा कंपनीचे लाल रंगाचे सुमारे पाच लाख रुपये किमतीचे ट्रॅक्टरही जप्त केले आहे.

🎯 कॅनाल बांधकामाच्या साईटवरून टँकर लंपास

आदर्श नगर, यवतमाळ येथील सोहेल शकिल अहमद (वय २९) यांनी याबाबत पांढरकवडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीनुसार, चिखलधरा, ता. केळापूर येथील कॅनाल बांधकामाच्या साईटवर निळ्या रंगाचा लोखंडी टँकर ठेवण्यात आला होता. या टँकरची अंदाजे किंमत ८० हजार रुपये होती. मात्र, अज्ञात व्यक्तींनी सदर टँकर चोरून नेल्याचे निदर्शनास आले.

तक्रारीवरून पांढरकवडा पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक १२१२/२०२६, कलम ३०३(२), भारतीय न्याय संहिता २०२३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

🎯 गोपनीय माहितीने तपासाला मिळाली दिशा

गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक एल. डी. तावरे यांनी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत डी.बी. पथक तसेच बिट अंमलदारांना चोरीस गेलेला टँकर आणि आरोपींचा तातडीने शोध घेण्याच्या सूचना दिल्या.

पोलीस उपनिरीक्षक नितिन सुशिर यांच्या नेतृत्वाखाली डी.बी. पथकाने घटनास्थळाची पाहणी करून तपास सुरू केला. पोलिसांनी विविध ठिकाणी चौकशी करण्यासोबतच गोपनीय बातमीदारांचे जाळे सक्रिय केले. त्यातून चोरीच्या टँकरबाबत महत्त्वाची माहिती पोलिसांच्या हाती लागली.

मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी कृष्णापूर, ता. केळापूर येथे शोध घेतला. यावेळी संशयित म्हणून—

  1. गुणवंत रामभाऊ ठाकरे (वय ४२ वर्षे)
  2. बाळू गुलाब आत्राम (वय ३५ वर्षे)
  3. मंगेश ऊर्फ गजानन मारोती सोयाम (वय ३३ वर्षे)

हे तिघे त्यांच्या घरी आढळून आले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत चौकशी सुरू केली.

🎯 शेलू बु. येथे लपविलेला चोरीचा टँकर सापडला

पोलिसांच्या चौकशीत तिघांकडून मिळालेल्या माहितीनुसार चोरीचा टँकर शेलू बु., ता. वणी येथे विकल्याचे समोर आले. त्यानंतर तपास पथकाने तिघांना सोबत घेऊन शेलू बु. येथे जाऊन शोध घेतला.

तेथे पोलिसांना सुमारे ८० हजार रुपये किमतीचा चोरीस गेलेला निळ्या रंगाचा लोखंडी टँकर मिळून आला. पोलिसांनी तो पंचनामा करून ताब्यात घेतला. यासोबतच चोरीच्या गुन्ह्यात वापरल्याचे सांगितलेले महिंद्रा कंपनीचे लाल रंगाचे ट्रॅक्टर, अंदाजे किंमत पाच लाख रुपये, हे देखील पोलिसांनी जप्त केले.

🎯 गुन्हा दाखल होताच तपासाची चक्रे वेगाने फिरली

चोरीची तक्रार दाखल झाल्यानंतर अवघ्या काही तासांत पोलिसांनी आरोपींचा माग काढत चोरीचा मुद्देमाल शोधून काढल्याने या कारवाईकडे विशेष लक्ष वेधले गेले आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून अवघ्या पाच तासांत चोरीचा छडा लावून टँकर हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले.

पांढरकवडा पोलिसांच्या डी.बी. पथकाने गोपनीय माहिती, तातडीची तपासाची दिशा आणि प्रत्यक्ष शोधमोहीम यांच्या माध्यमातून ही कारवाई पूर्ण केली.

🎯 वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

ही कारवाई यवतमाळचे पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात आणि सहायक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी, पांढरकवडा रॉबीन बन्सल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

पोलीस निरीक्षक एल. डी. तावरे यांच्या सूचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक नितिन सुशिर, सफौ. प्रमोद जुनुनकर, पोहवा. विलास जाधव, पोहवा. रविकांत दराडे, नापोका. सुनिल राठोड, नापोका. सचिन काकडे, पोकॉ. राजू मुत्यालवार आणि पोकॉ. कमलेश काकडे यांनी कारवाईत सहभाग घेतला.

सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोहवा. रविकांत दराडे करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment