ब्रेकिंग पांढरकवडा वणी क्रिकेट संपादकीय मनोरंजन नौकरी सामाजिक विशेष देश विदेश आध्यात्मिक इतर

औषधोपचारासोबत सामाजिक बांधिलकीचा संदेश; पांढरकवड्यात ‘जागतिक फार्मासिस्ट दिन’ उत्साहात

On: September 25, 2026 7:59 PM
Follow Us:
---Advertisement---

⛔रुग्णांना फळे-बिस्किटांचे वाटप, वृक्षारोपण, अन्नदानासह विद्यार्थ्यांना फार्मासिस्टच्या भूमिकेबाबत मार्गदर्शन

✍️पांढरकवडा : अशफाक खान


रुग्णांच्या आरोग्यसेवेत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या फार्मासिस्टच्या कार्याचा गौरव करण्याबरोबरच सामाजिक बांधिलकीची जाणीव जपत पांढरकवडा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीने शुक्रवार, २५ सप्टेंबर रोजी ‘जागतिक फार्मासिस्ट दिन’ विविध समाजोपयोगी उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने रुग्णसेवा, वृक्षारोपण, अन्नदान, जनावरांसाठी चारा तसेच विद्यार्थ्यांना आरोग्यविषयक मार्गदर्शन अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात उपजिल्हा रुग्णालय, पांढरकवडा येथून करण्यात आली. यावेळी रुग्णांना फळे व बिस्किटांचे वाटप करून त्यांच्या प्रकृतीची आस्थेने विचारपूस करण्यात आली. तसेच रुग्णांनी औषधे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार योग्य पद्धतीने व योग्य वेळी घेणे किती महत्त्वाचे आहे, याबाबत ‘पेशंट काउन्सेलिंग’च्या माध्यमातून मार्गदर्शन करण्यात आले. औषधांचा योग्य वापर, डोस, वेळ आणि डॉक्टरांच्या सूचनांचे पालन यासंदर्भातही उपस्थितांना माहिती देण्यात आली.

यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. वैशाली सातूरवार यांच्या उपस्थितीत रुग्णालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. आरोग्य आणि पर्यावरण यांचा परस्पर संबंध अधोरेखित करत ‘निरोगी समाजासाठी स्वच्छ व हिरवे पर्यावरण’ हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

यानंतर पांढरकवडा येथील गोरक्षण संस्थेला भेट देऊन गाईंना चारा व ठेप देण्यात आला. मुक्या प्राण्यांचीही काळजी घेणे ही सामाजिक जबाबदारी असल्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

गोपाळकृष्ण मंदिर परिसरात निराधार व गरजू नागरिकांसाठी अन्नदान आणि मिठाईचे वाटप करण्यात आले. यामुळे फार्मासिस्ट दिनाला केवळ औषध व आरोग्यसेवेपुरते मर्यादित न ठेवता मानवतेची आणि सामाजिक संवेदनशीलतेची जोड मिळाली.

दरम्यान, गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल येथे विद्यार्थ्यांसाठी ‘रोल ऑफ फार्मासिस्ट’ या विषयावर विशेष मार्गदर्शन करण्यात आले. औषधनिर्मितीपासून ते रुग्णांना औषधांच्या योग्य वापराबाबत मार्गदर्शन करण्यापर्यंत फार्मासिस्टची भूमिका किती महत्त्वाची आहे, याबाबत विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. शाळेचे मुख्याध्यापक स्वप्नील कुलकर्णी यांच्या उपस्थितीत शाळा परिसरात वृक्षारोपणही करण्यात आले.

याशिवाय श्रीमती इंदुबाई बोरेले वृद्धाश्रम तसेच विठ्ठल महात्मा येथे सायंकाळच्या जेवणाची विशेष व्यवस्था करण्यात आली. वृद्ध, निराधार आणि गरजू व्यक्तींसोबत वेळ घालवत त्यांना भोजन उपलब्ध करून देण्यात आले. या उपक्रमामुळे ‘सेवा हीच खरी समाजाची औषधी’ असा मानवतेचा संदेश अधोरेखित झाला.

जागतिक फार्मासिस्ट दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या विविध उपक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आरोग्यसेवेसोबत सामाजिक दायित्व जपणाऱ्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात आले.

या कार्यक्रमाला यवतमाळ केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे जिल्हा उपाध्यक्ष नितीन उत्तरवार, शहर अध्यक्ष ग्यानचंद बोगवत, सचिव अमित गावंडे, राजीव सातूरवार, राजीव मानकर, नटवर शर्मा, अविनाश चावरे, शोराब खान, सलमान खान, अंकित बाजोरिया यांच्यासह पांढरकवडा केमिस्ट असोसिएशनचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

फार्मासिस्ट दिनानिमित्त राबविण्यात आलेल्या या उपक्रमातून ‘आरोग्यसेवेबरोबरच समाजसेवाही तितकीच महत्त्वाची’ असल्याचा संदेश पांढरकवडा शहरात देण्यात आला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment