⛔ श्री दत्त मंदिर देवस्थान व वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा संयुक्त उपक्रम; ११ विविध आजारांवरील तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी व औषधोपचार
✍️पांढरकवडा : अशफाक खान
श्री संत ईस्तारी महाराज यांच्या ३५व्या पुण्यतिथीनिमित्त श्री दत्त मंदिर देवस्थान, श्री क्षेत्र किन्ही (नं.), ता. केळापूर, जि. यवतमाळ यांच्या वतीने आणि श्री वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी, २७ सप्टेंबर २०२६ रोजी भव्य मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत श्री दत्त मंदिर देवस्थान, किन्ही (नं.) येथे हे आरोग्य शिबिर होणार आहे.
ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांना विविध आजारांवर तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी, मार्गदर्शन आणि आवश्यक औषधोपचार उपलब्ध व्हावेत, या उद्देशाने या महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी या आरोग्यसेवेचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
या शिबिरामध्ये नेत्ररोग, अस्थिरोग, नाक-कान-घसा, क्षयरोग (टीबी), जनरल मेडिसिन, त्वचारोग, जनरल सर्जरी, स्त्रीरोग, बालरोग, दंतरोग तसेच मानसिक रोग अशा विविध आजारांशी संबंधित तज्ज्ञ डॉक्टरांकडून रुग्णांची तपासणी करण्यात येणार आहे. आवश्यकतेनुसार रुग्णांना औषधोपचार व पुढील उपचाराबाबत मार्गदर्शनही केले जाणार आहे.
या महाआरोग्य शिबिराला महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. डॉ. अशोकराव उईके यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
🎯 पुण्यतिथी उत्सवात विविध धार्मिक कार्यक्रम
दरम्यान, श्री दत्त मंदिर देवस्थानच्या वतीने श्री संत ईस्तारी महाराज पुण्यतिथी उत्सव २०२६ देखील रविवारी विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे.
उत्सवाच्या दिवशी सकाळी ९ वाजता अभिषेक व आरती होणार असून, दुपारी १२ वाजता पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर सायंकाळी ४ वाजता पूजा व आरती होणार असून, धार्मिक कार्यक्रमानंतर भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
श्री संत ईस्तारी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त दरवर्षी मोठ्या भक्तिभावाने विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले जाते. यंदाच्या उत्सवात धार्मिक कार्यक्रमांसोबतच ग्रामीण भागातील नागरिकांसाठी आरोग्यसेवेचा उपक्रम राबविण्यात येत असल्याने उत्सवाला सामाजिक बांधिलकीची जोड मिळाली आहे.
या सर्व कार्यक्रमांना भाविक, नागरिक आणि परिसरातील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून महाआरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा तसेच पुण्यतिथी उत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन श्री दत्त मंदिर देवस्थानचे अध्यक्ष श्री संत रामदास महाराज मिंदेवार आणि सचिव डॉ. शंकरराव मिंदेवार यांनी केले आहे.
🔺स्थळ : श्री दत्त मंदिर देवस्थान, श्री क्षेत्र किन्ही (नं.), ता. केळापूर, जि. यवतमाळ
🔺दिनांक : रविवार, २७ सप्टेंबर २०२६
🔺महाआरोग्य शिबिराची वेळ : सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत
विनीत :
श्री संत रामदास महाराज मिंदेवार, अध्यक्ष
डॉ. शंकरराव मिंदेवार, सचिव
श्री दत्त मंदिर देवस्थान, किन्ही (नं.) ता. केळापूर जि.यवतमाळ








