⛔ इरा इंग्लिश मीडियम स्कूलचा पराभव करत पटकावले विजेतेपद; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी संघ सज्ज
✍️पांढरकवडा: अशफाक खान
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा परिषद आणि तालुका क्रीडा अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तालुकास्तरीय शालेय फुटबॉल स्पर्धेत जिल्हा परिषद माध्यमिक शाळा, पांढरकवडा संघाने दमदार कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला. डॉ. यार्डी शाळा, उमरी येथे पार पडलेल्या या स्पर्धेत १७ वर्षांखालील मुलांच्या गटातील अंतिम सामना अत्यंत चुरशीचा आणि रोमांचक ठरला.
या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पांढरकवडा विरुद्ध इरा इंग्लिश मीडियम स्कूल,पांढरकवडा यांच्यात सामना रंगला. सामन्याच्या सुरुवातीपासूनच दोन्ही संघांनी आक्रमक खेळाचे प्रदर्शन करत प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली. जिल्हा परिषद माध्यमिक शाळेचा कर्णधार मोहम्मद हाशिर शेख याने नाणेफेक जिंकून प्रथम मैदानाची निवड केली. त्यानंतर दोन्ही संघांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले.
सामन्याच्या सुरुवातीच्या काही वेळातच जिल्हा परिषद माध्यमिक शाळेच्या खेळाडूंनी आक्रमक रणनीती आखत इरा इंग्लिश मीडियम स्कूलच्या बचावफळीवर दबाव निर्माण केला. या प्रयत्नांना यश मिळवत जिल्हा परिषद माध्यमिक शाळेने पहिला गोल नोंदवून आघाडी घेतली. त्यानंतर खेळाडूंनी आपला वेग आणि आक्रमकता कायम ठेवत आणखी दोन गोल करत सामन्यावर पूर्णपणे वर्चस्व मिळवले.
अखेर जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पांढरकवडा संघाने ३-० अशा शानदार फरकाने इरा इंग्लिश मीडियम स्कूलचा पराभव करत तालुकास्तरीय स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. इरा इंग्लिश मीडियम स्कूलला द्वितीय क्रमांकावर समाधान मानावे लागले.
या विजयामुळे जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पांढरकवडा संघाने जिल्हास्तरीय शालेय फुटबॉल स्पर्धेसाठी आपले स्थान निश्चित केले आहे. तालुकास्तरावर मिळविलेल्या या यशामुळे पांढरकवडा शहराच्या क्रीडा क्षेत्रात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, आगामी जिल्हास्तरीय स्पर्धेतही संघाकडून चांगल्या कामगिरीच्या अपेक्षा व्यक्त होत आहेत.
🎯 प्रशिक्षक सैय्यद अक्रम अली यांच्या मार्गदर्शनाखाली संघाची उल्लेखनीय कामगिरी
या विजयी संघाला प्रशिक्षक सैय्यद अक्रम अली यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. खेळाडूंचे नियमित प्रशिक्षण, शिस्त, संघभावना आणि मैदानावरील योग्य रणनीती यामुळे संघाने स्पर्धेत प्रभावी कामगिरी केली. विशेष म्हणजे सैय्यद अक्रम अली हे ग्रीन सिटी फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष असून मागील अनेक वर्षांपासून पांढरकवडा शहरात फुटबॉल खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी सातत्याने कार्यरत आहेत.
शहरातील नवोदित खेळाडूंना प्रशिक्षण देऊन त्यांना विविध स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन देणे, फुटबॉलचा प्रचार-प्रसार करणे आणि गुणवंत खेळाडूंना पुढील स्तरावर संधी मिळवून देण्यासाठी त्यांचे सातत्यपूर्ण प्रयत्न सुरू आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेल्या खेळाडूंनी तालुकास्तरीय स्पर्धेत मिळवलेले हे यश त्यांच्या प्रयत्नांना मिळालेली महत्त्वाची पावती मानली जात आहे.
🎯 यशाचे श्रेय मार्गदर्शकांना
विजयानंतर खेळाडूंनी आपल्या यशाचे श्रेय प्राचार्य अंगिरस निबुदे सर, मतीन सर, संयोजक सैय्यद वाहेद अली, मोहम्मद समीर शेख, सैय्यद जाकीर, अहमद शेख, अनवर, सैय्यद नोमान अली आणि प्रशिक्षक सैय्यद अक्रम अली यांना दिले.
संघाच्या या शानदार विजयाबद्दल शाळेतील शिक्षक, पालक, क्रीडाप्रेमी तसेच पांढरकवडा शहरातील नागरिकांकडून खेळाडू आणि प्रशिक्षकांचे अभिनंदन करण्यात येत आहे. जिल्हास्तरीय स्पर्धेतही संघाने उत्तम कामगिरी करून पांढरकवड्याचे नाव उज्ज्वल करावे, अशा शुभेच्छा सर्व स्तरातून व्यक्त होत आहेत.
🎯 विजयी संघातील खेळाडू
कर्णधार मोहम्मद हाशिर शेख, उपकर्णधार शौर्य जुमनाके, जियाम पटेल, रेहान्श गजबे, शौर्य गेडाम, सैय्यद साद, समर्थ सिर्तावार, जकवान पटेल, अमन कुमरे, सैय्यद शुमाइल, शिवम बागडे, कासिद पटेल, जब्बार बेग, सैय्यद जिया, सैय्यद जकी, रय्यान शेख, मोहम्मद शुरेम आणि अबरार बेग यांनी संघाच्या विजयात महत्त्वपूर्ण योगदान दिले.
🎯 पांढरकवड्याच्या फुटबॉलला नवी दिशा
तालुकास्तरीय स्पर्धेतील या विजयामुळे पांढरकवडा शहरातील फुटबॉल क्षेत्राला निश्चितच नवी ऊर्जा मिळाली आहे. ग्रामीण व निमशहरी भागातील विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या क्रीडा कौशल्याला योग्य प्रशिक्षण आणि संधी मिळाल्यास ते जिल्हा, विभागीय तसेच राज्यस्तरावरही चमकू शकतात, हे या विजयातून अधोरेखित झाले आहे. आता जिल्हास्तरीय स्पर्धेत जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पांढरकवडा संघाकडून दमदार कामगिरीची अपेक्षा आहे.








