ब्रेकिंग पांढरकवडा वणी क्रिकेट संपादकीय मनोरंजन नौकरी सामाजिक विशेष देश विदेश आध्यात्मिक इतर

करंजी शेतशिवारात गांजाची अवैध लागवड उघड; १६० झाडांसह ३.६४ लाखांचा मुद्देमाल जप्त

On: September 29, 2026 1:07 PM
Follow Us:
---Advertisement---

✍️पांढरकवडा : अशफाक खान


पांढरकवडा पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे धरणपोड-करंजी परिसरातील एका शेतात धाड टाकून गांजाची अवैध लागवड उघडकीस आणली. या कारवाईत तब्बल १६० गांजाची झाडे जप्त करण्यात आली असून, जप्त मुद्देमालाची एकूण किंमत ३ लाख ६४ हजार ७०० रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी शालीक बापूराव मेश्राम (वय ५५, रा. धरणपोड करंजी) याच्याविरुद्ध NDPS Act कलम ८(b), २०(a) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांना गोपनीय बातमीदारामार्फत खात्रीलायक माहिती मिळाली होती की, शालीक मेश्राम याने करंजी शेतशिवारातील आपल्या शेतात इतर पिकांच्या आड गांजाच्या प्रतिबंधित वनस्पतींची अवैध लागवड केली आहे. माहितीची गंभीर दखल घेत सहायक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी पांढरकवडा यांच्या परवानगीने पोलिसांनी पंच, वजन-मापन अधिकारी व पोलीस पथकासह संबंधित शेताकडे धाव घेतली.

पोलिस पथकाने शेतगट क्रमांक ९५ येथे पोहोचून लाईट व बॅटरीच्या प्रकाशात शेताची पाहणी केली असता तूर व पराटीच्या पिकामध्ये गांजाची झाडे लागवड केलेली आढळून आली. पोलिसांनी पंचांसमक्ष ही झाडे ताब्यात घेत त्यांचे वजन व मोजमाप केले.

कारवाईदरम्यान गांजाच्या झाडांची पाने, फुले, बिया, देठ, शेंडे, फांद्या व खोड यांचे एकत्रित वजन १५.१३२ किलो आढळून आले. त्यापैकी पाने, फुले, देठ व बियांचे निव्वळ वजन ७.०९४ किलो असून त्याची अंदाजे बाजारातील किंमत ३ लाख ५४ हजार ७०० रुपये असल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच झाडांचे खोड व मुळांचे वजन ७.७४४ किलो असून त्याची किंमत सुमारे १० हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

अशा प्रकारे पोलिसांनी घटनास्थळावरून एकूण ३ लाख ६४ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. शेतीतील नियमित पिकांच्या आड प्रतिबंधित गांजाची लागवड केल्याचे समोर आल्याने या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहिले जात आहे.

ही कारवाई यवतमाळचे पोलीस अधीक्षक श्री. कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक श्री. अशोक थोरात, सहायक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी पांढरकवडा श्री. रॉबिन बन्सल यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पोलीस निरीक्षक एल. डी. तावरे यांच्या सूचनेनुसार करण्यात आली.

कारवाईमध्ये पोलीस उपनिरीक्षक नितीन सुशिर, पोलीस उपनिरीक्षक सचिन रघुपती, सहायक फौजदार प्रमोद जुनुनकर, पोलीस हवालदार विलास जाधव, नापोका सुनील राठोड, सचिन काकडे, पोलीस शिपाई राजू मुत्यालवार तसेच होमगार्ड रोशन सोमशेट्टीवार, राकेश कात्रजवार आणि दिनेश सातपूते यांनी सहभाग घेतला.

या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सागर पेंढारकर करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment