✍️पांढरकवडा: अशफाक खान
चनाखा आणि घुबडी येथील शेतशिवारात पिकाचे नुकसान झाल्याच्या पार्श्वभूमीवर तहसीलदार राजेंद्र इंगळे यांनी स्वतः शेताच्या बांधावर जाऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांची वस्तुनिष्ठ पाहणी करून लवकरात लवकर पंचनामे करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
घुबडी गावातील शेतकरी श्री. महादेव पांडू बनसोड यांच्या शेताची तहसीलदार इंगळे यांनी पाहणी करून पिकाची सद्यस्थिती तसेच झालेल्या नुकसानीची माहिती त्यांनी घेतली. शेतकऱ्यांनी आपल्या अडचणी व नुकसानाबाबत तहसीलदारांसमोर माहिती मांडली.
यावेळी बोलताना तहसीलदार राजेंद्र इंगळे यांनी, “एकाही शेतकऱ्याला शासनाच्या लाभापासून वंचित ठेवले जाणार नाही. प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यक त्या कार्यवाहीसाठी पंचनामे करण्यात येतील,” अशी ग्वाही दिली. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
या पाहणीदरम्यान महसूल विभाग व कृषी विभागाचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. कृषी विभागाकडूनही पिकांची पाहणी करून नुकसानीची नोंद घेण्यात आली. संबंधित पंचनाम्याची प्रक्रिया लवकर पूर्ण करून पुढील कार्यवाही केली जाणार असल्याची माहिती देण्यात आली.
तहसीलदारांनी शेतकऱ्यांच्या बांधावर प्रत्यक्ष जाऊन पाहणी केल्याने प्रशासन शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहत असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
यावेळी सरपंच पांडुरंग कुमरे, प्रवीण येडमे, तलाठी संदीप किनाके, नामदेव बनसोडे, संदीप ताटे, संदीप चुकलवार, विजय बेले, रमेश मिचकंटवार, अरुण केतनवार, गणेश पेंदोर, गणपत ताटे, विठोबा बेले, अनुप केतनवार, अमोल बनसोड, विकास ताटे यांच्यासह गावातील मोठ्या संख्येने शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते. कृषी विभागाचे कृषी सहाय्यक श्री. बनसोड व सूरज आत्राम यांनीही पाहणी दरम्यान आवश्यक माहिती दिली.








