⛔पांढरकवडा पोलिसांची तातडीची कारवाई; गुन्हा दाखल होताच तपास पथक रवाना करून आरोपीला घेतले ताब्यात
✍️पांढरकवडा: अशफाक खान
अल्पवयीन मुलीवर लैंगिक शेरेबाजी केल्याच्या आरोपावरून तसेच तिच्या आई व कुटुंबीयांना अश्लील व लज्जास्पद शिवीगाळ केल्याप्रकरणी पांढरकवडा पोलिसांनी एका २५ वर्षीय युवकाला वरोरा, जिल्हा चंद्रपूर येथून अटक केली. निखील धरमपाल उमरे (वय २५, रा. वाई गणेशपूर, ता. केळापूर, जि. यवतमाळ) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २९ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ६ वाजताच्या सुमारास अल्पवयीन मुलगी गावातील मामाच्या घरून आपल्या घरी परत येत होती. यावेळी आरोपी निखील उमरे याने मुलीला एकटी पाहून तिच्याशी लैंगिक स्वरूपाची शेरेबाजी केल्याचा आरोप आहे. घरी परतल्यानंतर पीडित मुलीने घडलेला प्रकार आपल्या आईला सांगितला.
मुलीने सांगितलेल्या प्रकाराची माहिती मिळताच तिच्या आईने आरोपीच्या घरासमोर जाऊन, “माझ्या मुलीला असे का बोलला?” अशी विचारणा केली. यावेळी आरोपीने फिर्यादी महिला, तिची आई आणि पीडित अल्पवयीन मुलीला अश्लील व लज्जास्पद शिवीगाळ केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी पीडितेच्या आईने पांढरकवडा पोलीस ठाण्यात दिलेल्या जबानी रिपोर्टवरून निखील धरमपाल उमरे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील कलम ७५(१)(४), ७९ आणि २९६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्हा दाखल झाल्यानंतर पांढरकवडा पोलिसांनी आरोपीचा तातडीने शोध सुरू केला. तपासादरम्यान आरोपी वरोरा, जिल्हा चंद्रपूर येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांचे तपास पथक तत्काळ वरोऱ्याकडे रवाना झाले. पथकाने आरोपीचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेत अटक केली.
ही कारवाई यवतमाळचे पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात तसेच सहायक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी, पांढरकवडा रॉबिन बन्सल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. प्रभारी ठाणेदार स.पो.नि. रमाकांत खंदारे यांच्या सूचनेनुसार स.फो. प्रमोद जुनुनकर आणि पोलीस हवालदार विलास जाधव यांनी आरोपीचा शोध घेऊन अटकेची कारवाई केली.
दरम्यान, या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन रघुपती करीत आहेत.








