⛔ स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई; ४२ लाख २० हजारांचा मुद्देमाल जप्त, एका संशयिताला पकडण्यात यश
✍️पांढरकवडा : अशफाक खान
नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरून गोवंशीय जनावरांची कत्तलीसाठी अवैध वाहतूक होत असल्याची माहिती मिळताच यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखेने गुरुवारी, १ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी पांढरकवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठी कारवाई केली. साखरा गावाजवळ केलेल्या नाकाबंदीत चार बोलेरो पिकअप वाहनांमधून अत्यंत दाटीवाटीने आणि अमानुष पद्धतीने वाहतूक करण्यात येत असलेल्या ४० गोवंशीय जनावरांची सुटका करण्यात आली. या कारवाईत जनावरे आणि चार पिकअप वाहने मिळून तब्बल ४२ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा उपविभागात फरार आरोपी तसेच अवैध गोवंश वाहतूक व तस्करी करणाऱ्यांविरुद्ध कारवाईसाठी गस्त घालत होते. सकाळी सुमारे ६.३० वाजता साखरा परिसरात पेट्रोलिंगदरम्यान गोपनीय बातमीदारामार्फत चार पिकअप वाहनांत गोवंशीय जनावरांना कोंबून नागपूरहून हैदराबादच्या दिशेने कत्तलीसाठी नेण्यात येत असल्याची माहिती मिळाली.
माहितीची खातरजमा करून पोलिसांनी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वर साखरा गावाजवळ नाकाबंदी केली. नागपूरकडून येणाऱ्या वाहनांवर लक्ष ठेवून असताना काही वेळातच एकामागून एक चार पिकअप वाहने भरधाव वेगाने येताना पोलिसांच्या निदर्शनास आली. पोलिसांनी हाताने इशारा करून वाहने थांबविण्याचा प्रयत्न केला; मात्र चालकांनी पोलिसांचा इशारा झुगारून वाहने पुढे नेली.
यानंतर पोलिसांनी पोलीस स्टॉपच्या मदतीने चारही वाहनांचा पाठलाग सुरू केला. अखेर चालकांनी साखरा शिवारातील महामार्गालगत असलेल्या हरियाणा मेवात सरपंच ढाब्याच्या पार्किंगमध्ये वाहने उभी करून तेथून पळ काढला. पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला असता एका वाहनचालकाला पकडण्यात यश आले, तर उर्वरित चालक घटनास्थळावरून पसार झाले.
पकडण्यात आलेल्या संशयिताचे नाव प्रणय निरंजन सगुणे (वय २०, रा. गोरेवाडा वस्ती, नागपूर) असे असल्याचे पोलिसांनी सांगितले.
🎯 ताडपत्रीने पूर्णपणे बंदिस्त; जनावरांची दयनीय अवस्था
पोलिसांनी चारही पिकअप वाहनांची तपासणी केली असता त्यामध्ये एकूण ४० गोवंशीय बैल, गोरे व गायी आढळून आल्या. या जनावरांना आखूड दोऱ्यांनी बांधून अत्यंत कमी जागेत दाटीवाटीने कोंबण्यात आले होते. त्यांना हालचाल करण्यासाठी पुरेशी जागा नव्हती.
विशेष म्हणजे वाहनांवर दुहेरी जाड ताडपत्री लावून ती दोऱ्यांच्या साहाय्याने पूर्णपणे बंदिस्त करण्यात आली होती. त्यामुळे वाहनांच्या आतील भागात हवा व प्रकाशाची पुरेशी व्यवस्था नव्हती. तसेच जनावरांसाठी चारा अथवा पाण्याची कोणतीही व्यवस्था करण्यात आलेली नव्हती. वाहनांमध्ये निर्माण झालेल्या उष्णतेमुळे ही जनावरे व्याकुळ आणि वेदनादायक अवस्थेत आढळून आली.
पोलिसांनी तत्काळ सर्व ४० जनावरांची सुटका करून त्यांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याची कार्यवाही केली.
🎯 ४२ लाख २० हजारांचा मुद्देमाल जप्त
या कारवाईत जप्त करण्यात आलेल्या ४० गोवंशीय जनावरांची अंदाजे किंमत १२ लाख ७० हजार रुपये, तर गोवंशाची वाहतूक करण्यासाठी वापरण्यात आलेल्या चार पिकअप वाहनांची अंदाजे किंमत २९ लाख ५० हजार रुपये आहे. अशा प्रकारे पोलिसांनी एकूण ४२ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या प्रकरणी पांढरकवडा पोलीस ठाण्यात एकूण ११ आरोपींविरुद्ध प्राण्यांशी निर्दयतेने वागणे तसेच प्राणी संरक्षणासंदर्भातील विविध कायद्यांतील कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील फरार आरोपींचा शोध सुरू असून, पुढील तपास पांढरकवडा पोलीस करीत आहेत.
🎯 वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली धडक कारवाई
ही कारवाई यवतमाळचे पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश चवरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कारवाईत सपोनि दत्ता पेंडकर, पोउपनि धनराज हाके, पोहेकॉ सुनील खंडागळे, पोहेकॉ सुधीर पांडे, पोहेकॉ सुधीर पिदुरकर, पोना किशोर आडे, पोकॉ सलमान शेख, पोकॉ रजनीकांत मडावी, चापोहवा सतीश फुके आणि चासफौ नरेश राऊत यांनी सहभाग घेतला.
स्थानिक गुन्हे शाखेच्या या कारवाईमुळे राष्ट्रीय महामार्गावरून सुरू असलेल्या अवैध गोवंश वाहतुकीवर पोलिसांनी मोठा आघात केला असून, फरार आरोपींचा शोध घेऊन या तस्करीच्या साखळीमागील इतर व्यक्तींची माहिती समोर येते का, याकडे आता लक्ष लागले आहे.








