ब्रेकिंग पांढरकवडा वणी क्रिकेट संपादकीय मनोरंजन नौकरी सामाजिक विशेष देश विदेश आध्यात्मिक इतर

पाच वर्षांपासून फरार असलेल्या ३०७ च्या दोन आरोपींना पांढरकवडा पोलिसांनी ठोकल्या बेड्या

On: October 3, 2026 12:36 PM
Follow Us:
---Advertisement---

⛔गोपालपूर व मोहदा येथून गोपनीय माहितीच्या आधारे केली अटक; जुन्या गंभीर गुन्ह्याचा पोलिसांनी लावला छडा

✍️पांढरकवडा : अशफाक खान


गंभीर स्वरूपाच्या खुनाचा प्रयत्न (कलम ३०७), शिवीगाळ व धमकी प्रकरणात मागील तब्बल पाच वर्षांपासून फरार असलेल्या दोन आरोपींना पांढरकवडा पोलिसांनी अखेर अटक केली आहे. सुनिल शामराव पवार आणि अंकुश रामु पवार अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून, पोलिसांच्या गुन्हे प्रगटीकरण पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मिथुन तुळशिराम उईके, रा. आंबेडकर वार्ड, पांढरकवडा यांनी २१ जानेवारी २०२१ रोजी पांढरकवडा पोलीस ठाण्यात दिलेल्या जबानी रिपोर्टवरून अप. क्र. १०१/२०२१ अन्वये सुनिल शामराव पवार, अंकुश रामु पवार, कैलाश शामराव पवार (रा. मोहदा) आणि बेबीबाई शंकर पवार (रा. गोपालपूर) यांच्याविरुद्ध भादंवि कलम ३०७, ५०४, ५०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या प्रकरणातील कैलाश शामराव पवार आणि बेबीबाई शंकर पवार यांना यापूर्वीच अटक करण्यात आली होती. मात्र, आरोपी सुनिल शामराव पवार आणि अंकुश रामु पवार हे गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांच्या हाती न लागता फरार झाले होते. त्यांच्याविरुद्ध कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून कलम २९९ अन्वये न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते.

🎯 पाच वर्षांपासून पोलिसांना चकवा

गंभीर गुन्ह्यातील दोन्ही आरोपी मागील सुमारे पाच वर्षांपासून फरार असल्याने त्यांचा शोध घेऊन अटक करण्याचे निर्देश पोलीस निरीक्षक एल. डी. तावरे यांनी गुन्हे प्रगटीकरण पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक नितीन सुशिर यांना दिले होते. त्यानुसार पथकाने आरोपींच्या हालचालींबाबत माहिती मिळविण्यासाठी गोपनीय बातमीदारांचे जाळे सक्रिय केले.

दरम्यान, मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून आरोपी सुनिल शामराव पवार याला गोपालपूर येथून, तर आरोपी अंकुश रामु पवार याला मोहदा येथून ताब्यात घेतले. दोन्ही आरोपींना अटक करून पुढील कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे.

पाच वर्षांपासून फरार असलेल्या आरोपींना अखेर अटक करण्यात पोलिसांना यश आल्याने या कारवाईचे महत्त्व वाढले आहे. जुन्या गंभीर गुन्ह्यांतील फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पांढरकवडा पोलिसांकडून सुरू असलेल्या कारवाईला यामुळे आणखी गती मिळण्याची शक्यता आहे.

🎯 वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

ही कारवाई यवतमाळचे पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात तसेच सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी, पांढरकवडा रॉबिन बन्सल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

प्रभारी ठाणेदार सहाय्यक पोलीस निरीक्षक रमाकांत खंदारे यांच्या सूचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक नितीन सुशिर, पोलीस उपनिरीक्षक सचिन रघुपती, सहायक फौजदार प्रमोद जुनुनकर, पोलीस हवालदार विलास जाधव, नाईक पोलीस कॉन्स्टेबल सुनिल राठोड, सचिन काकडे आणि पोलीस शिपाई राजू मुत्यालवार यांनी ही कारवाई यशस्वीरीत्या पार पाडली.

फरार आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक करण्यासाठी पोलिसांनी केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना अखेर यश आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment