ब्रेकिंग पांढरकवडा वणी क्रिकेट संपादकीय मनोरंजन नौकरी सामाजिक विशेष देश विदेश आध्यात्मिक इतर

भिंतीला भगदाड पाडून तिजोरीच २५० फूट ओढली!

On: November 3, 2026 12:54 PM
Follow Us:
---Advertisement---

⛔ पाटणच्या बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये धाडसी चोरी; सहा लाखांवर डल्ला, सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

✍️झरी जामणी : अशफाक खान


बँकेच्या सुरक्षेची अभेद्य व्यवस्था भेदत चोरट्यांनी थेट बँकेच्या भिंतीला भगदाड पाडून आत प्रवेश केला आणि तब्बल सहा लाखांहून अधिक रुपयांची रोकड लंपास केली. एवढ्यावरच न थांबता चोरट्यांनी वजनदार तिजोरी बँकेबाहेर ओढून नेऊन ती फोडण्याचा प्रयत्न केला. ही धक्कादायक घटना पाटण येथील बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेत घडली असून, मंगळवारी (दि. ३ नोव्हेंबर) सकाळी प्रकार उघडकीस येताच परिसरात एकच खळबळ उडाली.

मिळालेल्या माहितीनुसार, चोरट्यांनी बँकेच्या सुरक्षेची भिंत फोडण्यासाठी सब्बल, घन, हातोडी आणि छन्नीचा वापर केला. बँकेच्या मागील भिंतीला मोठे भगदाड पाडून त्यांनी आत प्रवेश केला. त्यानंतर बँकेतील वजनदार तिजोरी बाहेर ओढून नेण्यात आली. तिजोरी बँकेपासून सुमारे २०० ते २५० फूट अंतरावर नेऊन चोरट्यांनी ती फोडली. तिजोरी फोडून त्यातील तब्बल ६ लाख १ हजार ९९९ रुपयांची रोकड लंपास करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

चोरट्यांनी तिजोरी बँकेच्या बाहेर नेण्यासाठी मोठी मेहनत घेतल्याचे घटनास्थळावरून स्पष्ट झाले. तिजोरी ओढत नेताना परिसरात त्यांच्या हालचालींचे काही पुरावेही पोलिसांना मिळाले आहेत. विशेष म्हणजे, मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी बँकेच्या मागील भिंतीला भगदाड पाडून प्रवेश केला. त्यानंतर तिजोरी बाहेर काढून ती लांब अंतरावर नेण्यात आली. अखेर तिजोरी फोडून त्यातील रोकड घेऊन चोरटे पसार झाले.

सकाळी नागरिकांच्या निदर्शनास बँकेच्या परिसरात भगदाड पडल्याचे तसेच तिजोरी बाहेर आढळल्याचे लक्षात आले. नागरिकांनी तत्काळ संबंधितांना माहिती दिल्यानंतर चोरीचा प्रकार उघडकीस आला. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश दळवे, मोबाइल फॉरेन्सिक पथक तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून चोरट्यांनी वापरलेल्या साहित्यांसह अन्य पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली.

मुकुटबनचे ठाणेदार सतीश जाधव तसेच शिरपूरचे ठाणेदार संतोष मनवर यांनीही घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. चोरट्यांचा माग काढण्यासाठी पोलिसांच्या विविध पथकांना रवाना करण्यात आले आहे.

🎯 वर्षभरापूर्वीही झाली होती चोरी

विशेष म्हणजे, याच बँक शाखेत काही वर्षांपूर्वीही चोरीची घटना घडली होती. त्यामुळे पुन्हा एकदा बँकेला चोरट्यांनी लक्ष्य केल्याने बँकेच्या सुरक्षाव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. बँकेच्या सुरक्षेसाठी सुरक्षा कर्मचारी नियुक्त असतानाही चोरट्यांनी भिंतीला भगदाड पाडून आत प्रवेश केला. त्यामुळे बँकेच्या सुरक्षा व्यवस्थेची जबाबदारी नेमकी कोणाची? असा सवाल आता उपस्थित होत आहे.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही घटनास्थळी भेट देऊन तपासाबाबत सूचना दिल्या.

पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, ठाणेदार मिलिंद सरकटे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. चोरट्यांचा माग काढण्यासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तसेच तांत्रिक पुराव्यांच्या आधारे आरोपींचा शोध घेतला जात आहे.

दरम्यान, एवढी मोठी रोकड असलेल्या बँक शाखेच्या सुरक्षेत चोरट्यांनी एवढ्या सहजपणे प्रवेश करून तिजोरी बाहेर काढल्याने बँकेच्या सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटी नेमक्या कुठे आहेत आणि त्याची जबाबदारी कोणाची? हा प्रश्न या घटनेनंतर ऐरणीवर आला आहे. चोरट्यांना लवकरात लवकर जेरबंद करून चोरीचा संपूर्ण छडा लावण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment