✍️वणी : प्रतिनिधी
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिलांच्या आरोग्याबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने वणी येथील नांदेपेरा रोडवरील नगराळे हॉस्पिटल येथे रविवार दि. ८ मार्च २०२६ रोजी महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. महिलांमध्ये वाढत्या आरोग्य समस्यांबाबत जागरूकता निर्माण करण्यासोबतच त्यांना योग्य वैद्यकीय सल्ला आणि तपासणी सुविधा उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
या आरोग्य शिबिराचे उद्घाटन सन्मान स्त्रीशक्ती फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ. किरणताई देवकर यांच्या हस्ते होणार असून, त्या एकविरा पतसंस्थेच्या संस्थापिका म्हणूनही सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांच्या उपस्थितीत महिला सक्षमीकरण आणि आरोग्य जागरूकतेचा संदेश देण्यात येणार आहे.
या शिबिरात प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. सौ. संचीता विजय नगराळे (M.B.B.S., M.D., गोल्ड मेडलिस्ट, KEM हॉस्पिटल, मुंबई) या महिलांच्या आरोग्याशी संबंधित महत्त्वपूर्ण विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत. विशेषतः गर्भाशयाच्या कॅन्सरची लक्षणे, त्याची वेळेत तपासणी, प्रतिबंधात्मक उपाय आणि लसीकरणाचे महत्त्व याबाबत सविस्तर माहिती देण्यात येणार आहे. महिलांमध्ये आढळणाऱ्या या गंभीर आजाराबाबत योग्य वेळी तपासणी व उपचार झाल्यास तो टाळता येऊ शकतो, याबाबतही त्या मार्गदर्शन करणार आहेत.
तसेच आयुर्वेद क्षेत्रातील तज्ज्ञ आयुर्वेदाचार्य सौ. सुवर्णा चरपे (BAMS, Dy. AC पुणे) या महिलांना नाडी परीक्षण, पंचकर्म उपचार पद्धती तसेच महिलांमध्ये सामान्यपणे आढळणाऱ्या “अंगावर पाणी जाणे” या समस्येबाबत सविस्तर मार्गदर्शन करणार आहेत. आयुर्वेदाच्या माध्यमातून आरोग्य टिकवण्याचे उपाय आणि नैसर्गिक उपचार पद्धतींचे महत्त्व याविषयीही त्या माहिती देणार आहेत.
या आरोग्य शिबिरात महिलांसाठी गर्भाशय कॅन्सर तपासणीसाठी पॅप स्मीअर टेस्ट विशेष सवलतीत उपलब्ध करून देण्यात आली आहे. या तपासणीची साधारणतः ८०० ते ९०० रुपये इतकी फी असते; मात्र शिबिराच्या निमित्ताने ती फक्त ४०० रुपयांमध्ये करून देण्यात येणार आहे. त्यामुळे महिलांना अत्यंत कमी खर्चात महत्त्वाची आरोग्य तपासणी करण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
शिबिराची वेळ सकाळी १० ते दुपारी २ अशी ठेवण्यात आली असून या कालावधीत महिलांची तपासणी, वैद्यकीय सल्ला तसेच आरोग्य मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे परिसरातील महिलांना तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला आणि आवश्यक तपासण्या एकाच ठिकाणी मिळणार असल्याने मोठा लाभ होणार आहे.
महिलांनी आपल्या आरोग्याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक असून जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा जास्तीत जास्त महिलांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. शिबिरात सहभागी होण्यासाठी इच्छुक महिलांनी नगराळे हॉस्पिटल, वणी येथे संपर्क साधून नोंदणी करावी, असेही आयोजकांनी सांगितले आहे.







