✍️वणी: महेश टिपले
आजच्या धावपळीच्या आणि तंत्रज्ञानाच्या युगात मुलांचे संगोपन करताना पालकांसमोर अनेक आव्हाने उभी राहत आहेत. मुलांशी संवाद साधताना राग, दबाव किंवा सतत सूचना देण्याऐवजी प्रेम, समजूतदारपणा आणि सकारात्मक संवादातून पालकत्व कसे प्रभावी करता येईल, याबाबत मार्गदर्शन करणारी ‘सौम्य पालकत्व – Soft Parenting’ या विषयावरील विशेष कार्यशाळा वणी येथे उत्साहात पार पडली.
वणीतील लायन्स इंग्लिश मीडियम स्कूल, देशमुखवाडी येथे लायन्स क्लब वणी आणि लायन्स चॅरिटेबल ट्रस्ट, वणी यांच्या संयुक्त विद्यमाने नर्सरी ते इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी दि. ३ ऑक्टोबर रोजी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. प्रसिद्ध मार्गदर्शक डॉ. दिपक घरझोडे यांनी पालकांशी संवाद साधत सौम्य पालकत्वाची संकल्पना अत्यंत सोप्या आणि प्रभावी पद्धतीने समजावून सांगितली.
कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी लायन्स चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष तथा माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार होते, तर लायन्स क्लब वणीचे अध्यक्ष तुषार नगरवाला यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रारंभी संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी मनोगत व्यक्त करत कार्यशाळेच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली. आजच्या काळात मुलांचे संगोपन ही केवळ जबाबदारी नसून एक संवेदनशील प्रक्रिया आहे. मुलांचे व्यक्तिमत्त्व, आत्मविश्वास आणि भावनिक विकास घडविण्यासाठी पालकांनी त्यांच्याशी प्रेमळ व सकारात्मक संवाद साधणे आवश्यक आहे. याच उद्देशाने पालकांना योग्य मार्गदर्शन मिळावे, हा कार्यशाळेचा मुख्य हेतू असल्याचे त्यांनी सांगितले.

🎯 मोबाईलपासून हट्टीपणापर्यंत; पालकांच्या अनेक प्रश्नांना उत्तरे
कार्यशाळेचे प्रमुख मार्गदर्शक डॉ. दिपक घरझोडे यांनी सुमारे सव्वा तास पालकांशी संवाद साधला. मुलांचे मानसशास्त्र समजून घेताना पालकांनी कोणती भूमिका घ्यावी, मुलांशी संवाद कसा साधावा, त्यांच्या भावनांना कसे समजून घ्यावे, याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले.
यासोबतच मोबाईलचा अतिवापर, मुलांचा हट्टीपणा, अभ्यासाची गोडी निर्माण करणे, मुलांच्या चुका समजून घेणे, रागावर नियंत्रण ठेवणे आणि पालक-मुलांमधील सुसंवाद वाढविणे अशा विविध विषयांवर त्यांनी उदाहरणांसह मार्गदर्शन केले. केवळ शिस्त लावण्यापेक्षा मुलांना समजून घेणे आणि त्यांच्या भावविश्वाशी जोडले जाणे अधिक महत्त्वाचे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
‘आपल्या एका तासाने आपल्या मुलाचे आयुष्य बदलू शकते!’ हा डॉ. घरझोडे यांचा संदेश उपस्थित पालकांसाठी विशेष प्रेरणादायी ठरला.
कार्यशाळेनंतर लायन्स ट्रस्टचे उपाध्यक्ष बलदेव खुंगर तसेच क्लबचे अध्यक्ष तुषार नगरवाला व खुशी नगरवाला यांच्या हस्ते डॉ. दिपक घरझोडे यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
🎯 पालकांचा उत्स्फूर्त सहभाग
या कार्यशाळेला नर्सरी ते इयत्ता पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यशाळेनंतर घेण्यात आलेल्या प्रश्नोत्तर सत्रात पालकांनी विविध समस्या व शंका मांडल्या. डॉ. घरझोडे यांनी त्यांच्या प्रश्नांना समर्पक उत्तरे देत दैनंदिन जीवनात सौम्य पालकत्वाचा अवलंब कसा करता येईल, याबाबत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सुरेख संचालन किरण बुजोणे यांनी केले, तर सुनिता खुसपुरे यांनी आभार प्रदर्शन केले. यावेळी अकॅडेमिक डायरेक्टर प्रशांत गोडे, प्राचार्या चित्रा देशपांडे, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते.
मुलांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्या भावनिक आणि मानसिक विकासालाही महत्त्व देणारी ही कार्यशाळा पालकांसाठी निश्चितच मार्गदर्शक आणि उपयुक्त ठरली.










