ब्रेकिंग पांढरकवडा वणी क्रिकेट संपादकीय मनोरंजन नौकरी सामाजिक विशेष देश विदेश आध्यात्मिक इतर

भजनाचे सूर, भाषणांचा जोश अन् नाटिकेतून स्वच्छता-विकासाचा संदेश

On: October 9, 2026 4:32 AM
Follow Us:
---Advertisement---

⛔ लायन्स इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये गांधी-शास्त्री जयंती उत्साहात

✍️वणी : महेश टिपले


देशमुखवाडी येथील लायन्स इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. भजन, विद्यार्थ्यांची प्रभावी भाषणे आणि नाटिकेतून स्वच्छता व शासकीय योजनांचा संदेश देत विद्यार्थ्यांनी दोन्ही महापुरुषांच्या विचारांना उजाळा दिला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे अकॅडेमिक डायरेक्टर प्रशांत गोडे होते. प्राचार्या चित्रा देशपांडे आणि पर्यवेक्षिका सुनीता खुसपुरे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

प्राचार्या चित्रा देशपांडे यांनी प्रास्ताविकातून दोन्ही महापुरुषांच्या जीवनकार्याचा परिचय करून देत सत्य, अहिंसा, साधेपणा, देशसेवा आणि कर्तव्यनिष्ठा या मूल्यांचे आजच्या पिढीतील महत्त्व अधोरेखित केले.

यानंतर शिक्षिका भारती वानखेडे आणि मनिषा बडनेरकर यांनी गीत तसेच ‘वैष्णव जन तो’ हे भजन सादर केले. विद्यार्थ्यांनी महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या जीवनकार्यावर आधारित भाषणे सादर करत त्यांच्या देशसेवेचे योगदान, आदर्श आणि राष्ट्रनिर्मितीतील भूमिका प्रभावीपणे मांडली.

🎯 नाटिकेतून स्वच्छता अन् विकसित भारताचा संदेश

कार्यक्रमातील विशेष आकर्षण ठरलेल्या नाटिकेतून विद्यार्थ्यांनी स्वच्छता, शासकीय योजना आणि नागरिकांच्या जीवनातील सकारात्मक बदलांचा प्रभावी संदेश दिला. सेवा संकल्प अभियानांतर्गत आयोजित या उपक्रमाचे मार्गदर्शन मनिषा ठाकरे आणि सीमा पांडे यांनी केले.

शासकीय योजनांचा लाभ घेतल्यामुळे नागरिकांचे जीवनमान कसे उंचावू शकते, विकासाला कशी गती मिळू शकते आणि त्यातून ‘विकसित भारत’ संकल्पनेला कशाप्रकारे बळ मिळते, हे विद्यार्थ्यांनी नाट्यरूपातून प्रभावीपणे सादर केले. या सादरीकरणाला उपस्थितांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

अकॅडेमिक डायरेक्टर प्रशांत गोडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना गांधीजींच्या सत्य-अहिंसेच्या विचारांसह लाल बहादूर शास्त्री यांच्या साधेपणा, प्रामाणिकपणा, शिस्त आणि देशनिष्ठेचा आदर्श विद्यार्थ्यांनी आत्मसात करावा, असे आवाहन केले.

पर्यवेक्षिका सुनीता खुसपुरे यांनी विद्यार्थ्यांना जयंतीच्या शुभेच्छा देत महापुरुषांचे विचार केवळ जयंतीपुरते मर्यादित न ठेवता ते दैनंदिन जीवनात आचरणात आणण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रुणाली नगराळे आणि मयुरी नन्ने यांनी केले, तर ज्योती ठावरी यांनी आभार मानले. कार्यक्रमाला शाळेतील शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment