✍️वणी : प्रतिनीधी
दरवर्षीप्रमाणे यंदाही वणी शहरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती मोठ्या उत्साहात, जल्लोषात आणि दिमाखात साजरी करण्यात आली. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आयोजित करण्यात आलेल्या या भव्य सोहळ्याने संपूर्ण परिसरात उत्सवाचे वातावरण निर्माण झाले होते. ढोल-ताशांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी, आकर्षक रोषणाई आणि भव्य देखाव्यामुळे हा सोहळा नागरिकांसाठी विशेष आकर्षणाचा ठरला.
या कार्यक्रमात बोलताना मनसेचे नेते राजू उंबरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा गौरव करताना रोखठोक मत व्यक्त केले. ते म्हणाले की, “छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य जिवंत ठेवण्यासाठी कोणत्याही आमदार किंवा खासदाराची गरज नसते. त्यासाठी फक्त रयतेची साथ, शिवप्रेम आणि प्रखर इच्छाशक्ती आवश्यक असते. वणीची रयत आपल्या राजासाठी नेहमीच सज्ज आहे आणि पुढेही राहील.”
राजू उंबरकर यांच्या संकल्पनेतून मागील काही वर्षांपासून वणी शहरात शिवजयंती उत्सव अत्यंत भव्य आणि आकर्षक पद्धतीने साजरा केला जात आहे. या परंपरेला यंदाही तितक्याच उत्साहाने पुढे नेण्यात आले. यावर्षीच्या सोहळ्याचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विद्यमान पुतळ्याच्या पाठीमागे उभारण्यात आलेली १०० फूटांहून अधिक उंचीची भव्य किल्ल्याची प्रतिकृती. या भव्य किल्ल्याच्या देखाव्यामुळे आणि रंगीबेरंगी विद्युत रोषणाईमुळे संपूर्ण चौक उजळून निघाला होता. नागरिकांनी या देखाव्याचे मोठ्या उत्साहाने दर्शन घेतले.
कार्यक्रमादरम्यान ढोल-ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतषबाजीने परिसर दणाणून गेला होता. शिवजयंती सोहळा पाहण्यासाठी शहरासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विशेषतः महिला, युवक आणि शिवप्रेमींची उपस्थिती लक्षणीय होती.
आपल्या भाषणात राजू उंबरकर यांनी शिवजयंती उत्सव केवळ एक उत्सव नसून रयतेच्या अस्मितेचे आणि शिवभक्तीचे प्रतीक असल्याचे सांगितले. त्यांनी पुढे सांगितले की, आगामी काळात वणी शहरातील शिवजयंती उत्सव यापेक्षाही अधिक भव्य आणि आकर्षक स्वरूपात साजरा करण्याचा मानस असून, त्यासाठी मनसे कार्यकर्ते प्रयत्नशील राहणार आहेत.
यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा भविष्यात याहूनही अधिक भव्य आणि अश्वारूढ स्वरूपात उभारण्याची भावना व्यक्त केली. यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना विशेष मोहीम राबविणार असून, नागरिकांच्या सहकार्याने हा संकल्प पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी माहितीही त्यांनी दिली.
या भव्य शिवजयंती सोहळ्याला विविध राजकीय पक्षांचे प्रमुख पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते तसेच शहरातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी वणी नगरपरिषदेतील नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी, महाराष्ट्र सैनिक तसेच शिवप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहिले.
या भव्य सोहळ्यामुळे वणी शहरात शिवभक्तीचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, मनसेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या शिवजयंती महोत्सवाची शहरात सर्वत्र चर्चा होत आहे.








