✍️वणी : प्रतीनिधी
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वर्धापन दिनाचे तसेच जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत वणी येथे महिलांच्या सन्मानासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मनसे नेते राजू उंबरकर यांच्या पुढाकारातून आशा सेविकांचा सन्मान सोहळा तसेच भव्य महिला भजन स्पर्धा आयोजित करण्यात आली असून, या उपक्रमाद्वारे समाजासाठी कार्य करणाऱ्या महिलांच्या योगदानाला मानाचा मुजरा देण्यात येणार आहे.
हा कार्यक्रम दि. ९ मार्च २०२६ रोजी दुपारी १२ वाजता वणी शहरातील शेतकरी मंदिर हॉल येथे पार पडणार आहे. या कार्यक्रमात वणी विधानसभा मतदारसंघातील वणी, मारेगाव आणि झरी-जामणी या तीनही तालुक्यांतील आशा सेविकांचा सन्मान करून त्यांच्या आरोग्य क्षेत्रातील मोलाच्या कार्याची दखल घेतली जाणार आहे.
ग्रामीण व शहरी भागात आरोग्य सेवेचे जाळे मजबूत करण्यासाठी आशा सेविका सातत्याने कार्यरत असतात. घराघरात जाऊन आरोग्यविषयक जनजागृती करणे, लसीकरण मोहिमा, माता-बाल आरोग्य सेवा, तसेच विविध आरोग्य योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे अशा अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या त्या पार पाडत असतात. या सेविकांच्या निस्वार्थ कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने हा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विदर्भातील महत्त्वाचे नेते म्हणून ओळख असलेले राजू उंबरकर यांनी पक्ष स्थापनेपासूनच विदर्भात संघटन मजबूत करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. सामाजिक बांधिलकी जपत दरवर्षी मनसेच्या वर्धापन दिनानिमित्त विविध समाजाभिमुख उपक्रमांचे आयोजन त्यांच्या वतीने केले जाते. शिक्षण, आरोग्य, सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रातील उपक्रमांद्वारे समाजाशी नाते दृढ करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. याच परंपरेचा भाग म्हणून यंदा महिला सन्मान सोहळा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाचे आणखी एक प्रमुख आकर्षण म्हणजे महिलांसाठी आयोजित करण्यात आलेली भव्य भजन स्पर्धा. या स्पर्धेमुळे महिलांमधील सांस्कृतिक कौशल्याला व्यासपीठ मिळणार असून, अनेक महिला भजन मंडळे मोठ्या उत्साहाने सहभागी होतील, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे. स्पर्धेसाठी आकर्षक रोख बक्षिसे जाहीर करण्यात आली आहेत.
बक्षिसे पुढीलप्रमाणे :
प्रथम क्रमांक : ₹११,०००
द्वितीय क्रमांक : ₹७,०००
तृतीय क्रमांक : ₹५,०००
महिलांमधील भक्तीपर परंपरा आणि सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी तसेच महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. भजनाच्या माध्यमातून सामाजिक ऐक्य आणि अध्यात्मिक वातावरण निर्माण होण्यास मदत होईल, असेही आयोजकांनी नमूद केले.
सदर भजन स्पर्धेमध्ये अधिकाधिक महिला भजन मंडळांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या राज्य उपाध्यक्षा अल्का टेकाम त्रिंबके, माजी नगराध्यक्ष प्रिया लभाने तसेच महिला सेनेच्या जिल्हाध्यक्षा अर्चना बोदाडकर यांनी केले आहे.
तसेच या कार्यक्रमाला वणी विधानसभा मतदारसंघातील तीनही तालुक्यांतील महिला, मनसेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
महिलांच्या सन्मानाचा आणि सांस्कृतिक परंपरेचा संगम असलेला हा कार्यक्रम वणी शहरात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडणार असून, समाजातील महिलांच्या योगदानाचा गौरव करण्याचा हा एक महत्त्वपूर्ण उपक्रम ठरणार आहे.








