✍️वणी : प्रतिनीधी
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून वणी शहरात कष्टकरी, गरजू आणि समाजासाठी अविरत परिश्रम करणाऱ्या महिलांच्या सन्मानार्थ एक प्रेरणादायी सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. धनोजे कुणबी महिला विकास संस्था आणि शारदा उत्सव समितीच्या अध्यक्षा सौ. संगीता संजय खाडे यांच्या पुढाकारातून शहरातील विविध ठिकाणी कष्टकरी महिलांना फळे व थंड पाण्याच्या बाटल्यांचे वाटप करून त्यांचा सन्मान करण्यात आला.

समाजातील महिलांच्या कष्टाची दखल घेत त्यांच्या परिश्रमाला सलाम करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. स्वतःच्या हिमतीवर संसार उभा करणाऱ्या आणि प्रतिकूल परिस्थितीतही कुटुंबासाठी अहोरात्र झटणाऱ्या महिलांच्या श्रमाचा सन्मान करण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात वणी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने करण्यात आली. यावेळी उपस्थित महिलांनी शिवरायांच्या कार्याची आठवण करून देत समाजासाठी कार्य करण्याचा संकल्प व्यक्त केला.
यानंतर संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष मैदानात उतरून उन्हातान्हात कष्ट करणाऱ्या महिलांशी संवाद साधला आणि त्यांना फळे व थंड पाण्याच्या बाटल्यांचे वाटप केले. यामध्ये प्रामुख्याने वणी येथील ग्रामीण रुग्णालय परिसर, नगराळे हॉस्पिटल परिसर तसेच शिवाजी चौकात भाजीपाला विक्री करणाऱ्या महिलांचा समावेश होता.

याशिवाय, रस्त्याच्या कडेला बसून छोट्या-मोठ्या व्यवसायातून आपला उदरनिर्वाह करणाऱ्या श्रमजीवी महिलांनाही या उपक्रमातून मदतीचा हात देण्यात आला. रणरणत्या उन्हात आपला संसार चालवण्यासाठी मेहनत करणाऱ्या या भगिनींना फळे आणि थंड पाण्याच्या बाटल्या देत त्यांचा सन्मान करण्यात आला. या उपक्रमामुळे महिलांना दिलासा मिळाल्याची भावना व्यक्त करण्यात आली.
विशेष म्हणजे, शारदा उत्सव समितीच्या अध्यक्षा सौ. संगीताताई खाडे यांच्या पुढाकाराने वणी येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या तसेच प्रसूती झालेल्या माता-भगिनींनाही फळे आणि पाण्याच्या बाटल्यांचे वाटप करण्यात आले. या माध्यमातून त्यांच्या आरोग्याची काळजी घेत त्यांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करण्यात आला.

तसेच, वणी पोलीस स्टेशन येथे कर्तव्य बजावणाऱ्या महिला पोलीस कर्मचाऱ्यांचाही यावेळी शाल देऊन सन्मान करण्यात आला. समाजातील सुरक्षिततेसाठी दिवस-रात्र कार्य करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांच्या सेवेला मानाचा मुजरा देत त्यांचे कौतुक करण्यात आले.
प्रतिकूल परिस्थितीतही खंबीरपणे उभे राहून स्वाभिमानाने जीवन जगणाऱ्या महिलांचा सन्मान करणे आणि समाजात त्यांच्या योगदानाची जाणीव करून देणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.
या प्रसंगी धनोजे कुणबी महिला विकास संस्थेच्या अध्यक्षा सौ. साधनाताई गोहोकार, शारदा उत्सव समितीच्या अध्यक्षा सौ. संगीताताई खाडे, समिती सल्लागार किरणताई देरकर, वंदनाताई आवारी, अर्चनाताई बोधाडकर, कविताताई चटकी, साधनाताई मत्ते, स्मिताताई नांदेकर, प्रमिलाताई पावडे, हर्षाताई सपाट, वंदनाताई बल्की, कांचनताई देरकर, रिताताई पहापळे, अर्चनाताई पिदुरकर, वर्षाताई खाडे, शामाताई तोटावार, सीमाताई खाडे, सविताताई आवारी, सुरेखाताई ढेंगळे यांसह धनोजे कुणबी समाजातील महिला पदाधिकारी व कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
वणी शहरात राबविण्यात आलेल्या या संवेदनशील आणि प्रेरणादायी उपक्रमाचे नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात कौतुक होत असून समाजातील महिलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा एक स्तुत्य प्रयत्न असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.








