✍️वणी : प्रतिनिधी
वणी शहरातील सेवानगर वार्डातील समाज मंदिर येथे नगरपरिषद सफाई कर्मचाऱ्यांची अत्यंत महत्त्वपूर्ण व उत्साहपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत नगरपरिषद सफाई कर्मचाऱ्यांच्या हितासाठी स्वतंत्र आणि सक्षम व्यासपीठ निर्माण करण्याच्या उद्देशाने अखिल भारतीय सफाई मजदूर युनियन, या संघटनेची अधिकृत स्थापना करण्यात आली. विशेष म्हणजे, सुरुवातीलाच तब्बल 160 (107 नियमित सफाई कर्मचारी +53 कंत्राटी सफाई कर्मचारी ) सदस्यांचा सहभाग असलेली ही संघटना उभी राहिल्याने सफाई कर्मचारी वर्गात मोठा उत्साह पाहायला मिळाला.
या बैठकीला भिम आर्मीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र उर्फ बबलूभाऊ मेश्राम, सामाजिक कार्यकर्ते प्रवीण खानझोडे तसेच कायदे विषयक मार्गदर्शनासाठी ॲड. राहुलभाऊ खापर्डे यांची प्रमुख उपस्थिती होती. नगरपरिषदेमधील विविध विभागांतील सफाई कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित राहून बैठकीला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. बैठकीदरम्यान अखिल भारतीय सफाई मजदूर युनियन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची निवड सर्वानुमते करण्यात आली.

त्यामध्ये रवींद्र उर्फ बबलूभाऊ मेश्राम यांची अध्यक्षपदी,
प्रवीण खानझोडे यांची उपाध्यक्षपदी, ॲड. राहुलभाऊ खापर्डे यांची सल्लागारपदी निवड करण्यात आली.
नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे उपस्थितांकडून जोरदार स्वागत करण्यात आले.
नवनिर्वाचित अध्यक्ष रवींद्र मेश्राम यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, नगरपरिषद सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित समस्या सोडविणे, त्यांच्या हक्कांचे संरक्षण करणे आणि प्रशासनाशी समन्वय साधून कामकाज अधिक सुलभ करणे हे संघटनेचे प्रमुख उद्दिष्ट राहील. सफाई कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी अखिल भारतीय सफाई मजदूर युनियन संघटना कटिबद्ध राहील, असे त्यांनी ठामपणे स्पष्ट केले.
या संघटनेच्या स्थापनेमुळे सफाई कर्मचारी वर्गाला एकत्र येऊन संघटितपणे आपल्या हक्कांसाठी लढण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. यामुळे सफाई कर्मचाऱ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, त्यांच्या विविध प्रश्नांना योग्य न्याय मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
बैठकीचा समारोप सकारात्मक वातावरणात झाला. यावेळी येत्या काळात अखिल भारतीय सफाई मजदूर युनियन, संघटनेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविणे, तसेच आवश्यकतेनुसार आंदोलनात्मक भूमिका घेण्याची तयारी असल्याची माहिती देण्यात आली.
एकूणच, 160 सदस्यांसह स्थापन झालेली ही अखिल भारतीय सफाई मजदूर युनियन, ही संघटना वणी नगरपरिषद सफाई मजदूर कर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठी एक प्रभावी आणि मजबूत व्यासपीठ ठरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.






