ब्रेकिंग पांढरकवडा वणी क्रिकेट संपादकीय मनोरंजन नौकरी सामाजिक विशेष देश विदेश आध्यात्मिक इतर

जळका शिवारातील अज्ञात मृतदेहाची ओळख पटली; मृतक पांढरकवड्यातील राहुल जोशी

On: June 16, 2026 2:14 PM
Follow Us:
---Advertisement---

अवघ्या दोन तासांत पोलिसांनी उलगडले रहस्य; मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट

✍️मारेगाव / अशफाक खान

मारेगाव तालुक्यातील जळका शिवारात रोडलगत असलेल्या नालीमध्ये आढळलेल्या अज्ञात पुरुषाच्या मृतदेहाची ओळख अवघ्या दोन तासांत पटल्याने या प्रकरणाला महत्त्वाचे वळण मिळाले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत व्यक्तीचे नाव राहुल हरिश्चंद्र जोशी (वय ४६) असे असून ते हरि विष्णू लेआऊट, आखाडा वॉर्ड, पांढरकवडा, ता. केळापूर, जि. यवतमाळ येथील रहिवासी होते.

मंगळवारी (दि. १६) दुपारी सुमारे १२.३० वाजताच्या सुमारास जळका शिवारातील साईनाथ परचाके यांच्या शेताजवळील नालीमध्ये एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आला होता. घटनेची माहिती मिळताच मारेगाव पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय, मारेगाव येथे पाठविला.

प्राथमिक माहितीनुसार मृत व्यक्तीचे वय अंदाजे ४५ ते ५० वर्षे, उंची सुमारे ५ फूट ८ इंच, रंग गोरा, शरीरयष्टी सडपातळ, काळे-पांढरे केस आणि वाढलेली दाढी अशी ओळख सांगण्यात आली होती. त्यांच्या अंगावर फिकट गुलाबी रंगाचा हाफ टी-शर्ट व राखाडी रंगाची हाफ पँट होती.

या घटनेची माहिती जळका येथील पोलीस पाटील विजय मोघे यांनी मारेगाव पोलिसांना दिली होती. अज्ञात मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी पोलिसांनी नागरिकांचे सहकार्य मागितले होते. त्यानंतर अल्पावधीतच मृतकाची ओळख राहुल जोशी अशी पटल्याने तपासाला महत्त्वाची दिशा मिळाली आहे.

दरम्यान, राहुल जोशी यांच्या मृत्यूमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. उत्तरीय तपासणीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर तसेच सखोल पोलिस तपास पूर्ण झाल्यानंतरच मृत्यूचे खरे कारण समोर येणार आहे. त्यामुळे मृत्यूचे स्वरूप नैसर्गिक, अपघाती की अन्य कोणत्या कारणामुळे झाले, याबाबत कोणताही निष्कर्ष काढणे सध्या घाईचे ठरणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार सागर दानडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रवी बुरकुले, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दिगंबर किनाके तसेच पोलीस कर्मचारी नामदेव भटारकर, सागर दीपेवार आणि विकास खंडारे करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment