ब्रेकिंग पांढरकवडा वणी क्रिकेट संपादकीय मनोरंजन नौकरी सामाजिक विशेष देश विदेश आध्यात्मिक इतर

घुबडी स्मशान भूमीतील अवैध सागवान वृक्षतोड प्रकरणाने खळबळ

On: May 25, 2026 3:39 PM
Follow Us:
---Advertisement---

वन विभागाच्या संगनमताचा संशय; ग्रामस्थांची चौकशी व कठोर कारवाईची मागणी

✍️पांढरकवडा: प्रतिनीधी


केळापूर तालुक्यातील  घुबडी येथील स्मशानभूमी परिसरात झालेल्या कथित अवैध सागवान वृक्षतोड प्रकरणामुळे गावात तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामपंचायत सरपंच, सचिव तसेच ग्रामस्थांनी एकत्र येत या प्रकरणाची गंभीर दखल घेत संबंधित विभागाकडे अधिकृत तक्रार दाखल केली असून, वन विभागातील काही कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या संगनमताने ही अवैध कटाई झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, घुबडी येथील स्मशानभूमीलगत असलेल्या शेतकरी घडसनवार यांच्या शेतातील सागवान वृक्षतोडीसाठी अधिकृत परवाना काढण्यात आला होता. मात्र या परवान्याचा गैरफायदा घेत स्मशानभूमी परिसरातील सागवान वृक्षांची देखील मोठ्या प्रमाणात अवैध कटाई करण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

या गंभीर प्रकाराची माहिती समोर आल्यानंतर ग्रामपंचायतीमार्फत उपविभागीय अधिकारी पांढरकवडा, वनपरिक्षेत्र अधिकारी पांढरकवडा तसेच उपवनसंरक्षक अधिकारी पांढरकवडा यांना निवेदन सादर करण्यात आले आहे. संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

🎯 स्मशानभूमीच्या जागेवरही प्रश्नचिन्ह

या प्रकरणात आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. २९ ऑगस्ट १९८५ च्या फेरफार पत्रानुसार घुबडी येथील स्मशानभूमीसाठी ०.४० आर जागेची नोंद असल्याचे स्पष्ट होते. मात्र सध्याच्या नोंदींमध्ये केवळ ०.३० आर जागा दाखविण्यात येत असल्याची माहिती ग्रामस्थांना मिळाली आहे.

यामुळे उर्वरित ०.१० आर जागा नेमकी कुठे गेली? ती कोणी बळकावली किंवा गायब केली? असा गंभीर प्रश्न ग्रामस्थ, ग्रामपंचायत सरपंच व सचिव यांच्यासमोर निर्माण झाला आहे. या संदर्भात महसूल व वन विभागाच्या भूमिकेवरही संशय व्यक्त केला जात आहे.

🎯 “झाडे लावा” म्हणणारेच झाडतोडीत सहभागी?

एकीकडे शासनाच्या वतीने “झाडे लावा, झाडे जगवा” अशा मोहिमा राबवल्या जात आहेत. स्मशानभूमी परिसर हरित करण्यासाठी लाखो रुपयांचा निधी खर्च करून वृक्षलागवड करण्यात आली होती. मात्र त्याच परिसरातील सागवान वृक्षांची कटाई झाल्यामुळे ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

“जर स्मशानभूमी परिसर संरक्षित असेल, तर त्या ठिकाणची झाडे तोडण्यास परवानगी देण्यात आलीच कशी?” असा सवाल नागरिकांकडून उपस्थित करण्यात येत आहे. काही वन कर्मचाऱ्यांच्या संगनमताने ही वृक्षतोड झाल्याची चर्चा परिसरात सुरू असून, या प्रकरणात उच्चस्तरीय चौकशीची मागणी जोर धरत आहे.

🎯 ग्रामस्थांचा इशारा

संबंधित विभागाने या प्रकरणात तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, स्मशानभूमीची जमीन, पर्यावरण संरक्षण आणि शासकीय नोंदी यासंदर्भातील हा प्रकार अत्यंत गंभीर असल्याने प्रशासनाने निष्पक्ष चौकशी करून सत्य जनतेसमोर आणावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment