⛔१४ विद्यार्थ्यांनी मिळवले ९० टक्क्यांहून अधिक गुण; ७५ टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या ७० विद्यार्थ्यांचा सत्कार
✍️वणी प्रतिनीधी
वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे एस.एस.सी. परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थी व त्यांच्या पालकांच्या सन्मानार्थ आयोजित करण्यात आलेला गुणगौरव सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. विद्यार्थ्यांच्या यशाचा गौरव करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात पालक, शिक्षक, विद्यार्थी तसेच मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वणी लायन्स चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष तथा माजी आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून बलदेवजी खुंगर, विद्यालयाचे अकॅडमिक डायरेक्टर प्रशांत गोडे तसेच विद्यालयाच्या प्राचार्या चित्रा देशपांडे यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
यंदाच्या एस.एस.सी. परीक्षेत विद्यालयाने शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखत उल्लेखनीय यश संपादन केले. विद्यालयातील तब्बल १४ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवत विद्यालयाचे नाव उज्ज्वल केले. तसेच ७५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण प्राप्त करणाऱ्या सत्तर गुणवंत विद्यार्थ्यांचा आणि त्यांच्या पालकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक करताना सातत्यपूर्ण अभ्यास, कठोर परिश्रम आणि शिक्षक-पालकांच्या सहकार्याचे महत्त्व अधोरेखित केले. अध्यक्षीय भाषणात संजीव रेड्डी बोदकुरवार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “यश मिळवण्यासाठी मेहनत, शिस्त आणि संघटित प्रयत्न अत्यंत आवश्यक असतात. विद्यार्थ्यांनी केवळ गुणांपुरते मर्यादित न राहता उत्तम व्यक्तिमत्त्व घडविण्यावर भर द्यावा.”
विद्यालयाचे अकॅडमिक डायरेक्टर प्रशांत गोडे यांनी विद्यार्थ्यांच्या यशामागील शिक्षकांचे योगदान अधोरेखित करताना विद्यालयात गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी सातत्याने प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. प्राचार्या चित्रा देशपांडे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून भविष्यातही विद्यालयाचा उत्कृष्ट निकाल कायम राखण्याचा विश्वास व्यक्त केला.
कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. पालकांनीही आपल्या पाल्यांच्या यशाबद्दल समाधान व्यक्त करत विद्यालयाच्या शैक्षणिक कार्याचे कौतुक केले.
कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन विजय भगत यांनी केले, तर आभार प्रदर्शन लंकेश चुरे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. विद्यालयाच्या या उल्लेखनीय यशामुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून सर्व स्तरांतून विद्यालयाचे अभिनंदन करण्यात येत आहे.










