✍️पांढरकवडा : अशफाक खान
यवतमाळ जिल्ह्यातील प्रसिद्ध टीपेश्वर वन्यजीव अभयारण्यात वाघीण आणि बिबट्या यांच्यात झालेल्या नैसर्गिक संघर्षात एका अंदाजे चार वर्षीय नर बिबट्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वन्यजीवांच्या अधिवासात अन्नसाखळी, शिकारीवरील वर्चस्व आणि क्षेत्रीय स्पर्धेमुळे निर्माण होणाऱ्या संघर्षाचे हे जिवंत उदाहरण मानले जात असून, या घटनेमुळे वन्यजीव अभ्यासक आणि पर्यावरणप्रेमींचे लक्ष पुन्हा एकदा टीपेश्वरकडे वेधले गेले आहे.
वन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, टी-४४ क्रमांकाची ‘डेझी’ नावाने ओळखली जाणारी वाघीण अभयारण्यातील पर्यटक आणि वन्यजीव छायाचित्रकारांमध्ये विशेष लोकप्रिय आहे. काही दिवसांपूर्वी डेझीने एका हरणाची शिकार केली होती. या शिकारीवर ताबा मिळविण्याच्या उद्देशाने एक बिबट्या त्या ठिकाणी पोहोचला. शिकारीवरील हक्क आणि वर्चस्वाच्या मुद्द्यावरून वाघीण व बिबट्या आमनेसामने आले आणि त्यांच्यात तीव्र संघर्ष उभा राहिला.

वन अधिकाऱ्यांच्या प्राथमिक तपासानुसार, संघर्ष अत्यंत आक्रमक स्वरूपाचा होता. वाघीण आकाराने आणि ताकदीने अधिक सक्षम असल्याने तिने बिबट्यावर जोरदार हल्ला केला. या झटापटीत बिबट्याला गंभीर दुखापती झाल्या आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. संघर्षानंतर वाघिणीने मृत बिबट्याचा मृतदेह तलावालगतच्या डोंगराच्या उतारावरील बांबूच्या दाट झुडपांमध्ये नेऊन ठेवला होता.
दरम्यान, अभयारण्यात नियमित गस्त घालत असलेल्या वनमजुरांच्या निदर्शनास हा मृतदेह आला. त्यांनी तात्काळ वरिष्ठ वन अधिकाऱ्यांना याची माहिती दिली. माहिती मिळताच वन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि संपूर्ण परिसराची पाहणी करण्यात आली. सदर घटना पारवा वनपरिक्षेत्रातील माथनी वर्तुळ अंतर्गत बोथ बीटच्या कंपार्टमेंट क्रमांक १३८ मध्ये घडल्याचे निष्पन्न झाले.
घटनास्थळ अत्यंत दुर्गम व डोंगराळ भागात असल्याने तेथेच शवविच्छेदन आणि दहनविधी करणे शक्य नव्हते. त्यामुळे वन विभागाने आवश्यक खबरदारी घेत मृत बिबट्याचा मृतदेह सुरक्षितपणे बाहेर आणला. त्यानंतर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शवविच्छेदन करण्यात आले.
शवविच्छेदनादरम्यान बिबट्याच्या शरीरावर अनेक ठिकाणी वाघिणीच्या नखांचे आणि दातांचे खोलवर घाव आढळून आले. मानेजवळ, पाठीवर तसेच शरीराच्या विविध भागांवर गंभीर जखमा असल्याचे निदर्शनास आले. प्राथमिक वैद्यकीय निरीक्षणानुसार या जखमांमुळेच बिबट्याचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. पुढील वैज्ञानिक तपासणीसाठी बिबट्याचे काही महत्त्वाचे अवयव आणि जैविक नमुने जतन करण्यात आले. आवश्यक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर वन विभागाच्या उपस्थितीत मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
ही संपूर्ण शवविच्छेदन प्रक्रिया डॉ. रणजीत नाळे यांच्या नेतृत्वाखाली डॉ. पायघन आणि डॉ. काळमेघ यांनी पार पाडली. तसेच संपूर्ण कारवाईदरम्यान टीपेश्वर अभयारण्याचे सहाय्यक वनसंरक्षक उदय आव्हाड, वनपरिक्षेत्र अधिकारी प्रशांत सोनुले, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रणजीत नाळे, मानद वन्यजीव रक्षक रमजान विराणी, निसर्ग मित्र मंचाचे अध्यक्ष सुबोध काळपांडे यांची उपस्थिती होती.
याशिवाय वनपाल शशांक सोनटक्के, वनपाल चंद्रकांत हेमके, वनरक्षक दिगंबर पोटे, वनरक्षक स्मिता बेलेकर तसेच वनमजूर कर्मचारी यांनीही या मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला.
वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, वाघ आणि बिबट्या हे दोन्ही सर्वोच्च शिकारी प्राणी असले तरी जंगलातील अन्नस्रोत, शिकार आणि अधिवासावरून त्यांच्यात संघर्ष होणे ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. विशेषतः एखाद्या शिकारीवर दुसरा शिकारी ताबा मिळविण्याचा प्रयत्न करतो तेव्हा अशा घटना घडण्याची शक्यता वाढते. अनेकदा बिबटे वाघांच्या शिकारीपासून दूर राहणे पसंत करतात; मात्र काही प्रसंगी अन्नाच्या शोधात किंवा संधी साधण्याच्या प्रयत्नात ते वाघांच्या संपर्कात येतात आणि संघर्ष निर्माण होतो.
वन्यजीव तज्ज्ञांच्या मते, अशा घटना जंगलातील परिसंस्थेचा नैसर्गिक भाग असून त्या वन्यजीवांच्या वर्तनशास्त्राचा महत्त्वाचा पैलू दर्शवतात. यामुळे जंगलातील अन्नसाखळी, क्षेत्रीय वर्चस्व आणि जैवविविधतेतील संतुलन कसे कार्य करते, याचीही माहिती मिळते.
सदर घटनेची माहिती मिळताच वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. प्राथमिक तपासात कोणत्याही प्रकारचा मानवी हस्तक्षेप अथवा शिकारीचा संशय आढळून आला नसून, वाघीण आणि बिबट्या यांच्यात झालेल्या नैसर्गिक संघर्षातच बिबट्याचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
या प्रकरणातील सर्व कार्यवाही विभागीय वन अधिकारी उत्तम फड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. टीपेश्वर अभयारण्यात घडलेल्या या घटनेमुळे जंगलातील वन्यजीवांमधील संघर्ष, अन्नसाखळीतील स्पर्धा आणि नैसर्गिक निवडीची प्रक्रिया पुन्हा एकदा अधोरेखित झाली असून, वन्यजीव संवर्धनाच्या दृष्टीने ही घटना महत्त्वपूर्ण मानली जात आहे.







