⛔उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पात्र शेतकऱ्यांना रोजगार देण्याची जोरदार मागणी; प्रदूषण, सुरक्षा, रोजगार आणि विकासाच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा
✍️वणी: प्रतिनीधी
वणी विधानसभा क्षेत्रातील खाण प्रभावित नागरिकांच्या आरोग्य, पर्यावरण, रोजगार, सुरक्षा आणि मूलभूत सुविधांशी संबंधित प्रलंबित प्रश्नांवर आमदार संजय देरकर यांनी बुधवारी वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड (वेकोली) मुख्यालय, नागपूर येथे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक (सीएमडी) श्री. पांडे यांच्यासोबत सविस्तर बैठक घेतली. या बैठकीत तब्बल 23 महत्त्वपूर्ण जनहिताच्या मुद्द्यांवर आमदार देरकर यांनी सडेतोड भूमिका मांडत तातडीच्या कार्यवाहीची मागणी केली.
वणी नॉर्थ, वणी, माजरी, राजूर, कोकणी, उकणी तसेच परिसरातील खाण प्रभावित गावांमध्ये वाढत चाललेल्या प्रदूषणाच्या समस्यांपासून स्थानिक युवकांच्या रोजगारापर्यंत विविध विषयांवर आमदार देरकर यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले. कोळसा वाहतुकीतील अनियमितता, खाण क्षेत्रातील सुरक्षा, सीएसआर निधीचा प्रभावी वापर, रेल्वे सायडिंगमुळे निर्माण होणाऱ्या अडचणी आणि पर्यावरणीय धोक्यांबाबत त्यांनी सविस्तर निवेदन सादर केले.
🎯 कोळसा वाहतुकीतील नियमभंगावर कठोर भूमिका
बैठकीत कोळसा वाहतुकीदरम्यान होणारे नियमभंग, ओव्हरलोड व अनफिट वाहनांमुळे वाढणारे अपघात, धुळीचे प्रदूषण आणि रस्त्यांची होणारी दुरवस्था याबाबत आमदार देरकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. खाण क्षेत्रात हाय-प्रेशर वॉटर स्प्रिंकलिंग सिस्टीम, डस्ट सप्रेशन सिस्टीम, डस्ट स्क्रीन वॉल उभारणे, कोळसा वाहतूक करणारी सर्व वाहने व रेल्वे वॅगन पूर्णपणे झाकूनच वाहतूक करणे, वायू गुणवत्ता मापन केंद्रांची स्थापना आणि नियमित पर्यावरणीय अहवाल प्रसिद्ध करण्याची मागणी त्यांनी केली.
🎯 माजरी परिसरातील ओव्हरबर्डन डम्पिंगचा प्रश्न ऐरणीवर
माजरी परिसरात सुरू असलेल्या ओव्हरबर्डन डम्पिंगमुळे शेतजमिनी, भूजलस्त्रोत आणि पर्यावरणावर होत असलेल्या दुष्परिणामांचा मुद्दा आमदार देरकर यांनी ठळकपणे मांडला. प्रभावित शेतकऱ्यांना योग्य नुकसानभरपाई देऊन शेती आणि जलस्रोतांचे संरक्षण करण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी त्यांनी केली.
🎯 उच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याची ठाम मागणी
बैठकीतील सर्वाधिक महत्त्वाचा विषय म्हणजे पात्र शेतकरी कुटुंबांना रोजगार देण्याचा प्रश्न ठरला. आमदार संजय देरकर यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने रिट याचिका क्रमांक 1748/2025 मध्ये 11 डिसेंबर 2025 रोजी दिलेल्या आदेशाचा संदर्भ देत, सीबीए कायद्यांतर्गत जमीन संपादित झालेल्या पात्र शेतकरी कुटुंबांचा रोजगाराचा अधिकार केवळ दिवाणी वाद प्रलंबित असल्याच्या कारणावरून नाकारता येणार नसल्याचे स्पष्ट केले.
मुंगोली-निर्गुडा डीप विस्तारीकरण प्रकल्पांतर्गत मौजा शिवनी जहांगीर येथील पात्र शेतकरी कुटुंबाच्या रोजगाराचा प्रलंबित प्रश्न तातडीने निकाली काढून न्यायालयीन आदेशाची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी जोरदार मागणी त्यांनी केली.
🎯 स्थानिक युवकांना रोजगारात प्राधान्य देण्याची मागणी
वणी विधानसभा क्षेत्रातील वाढती बेरोजगारी लक्षात घेता वेकोली तसेच संबंधित कंत्राटी कंपन्यांमध्ये स्थानिक युवकांना रोजगारात प्राधान्य देण्याची मागणी आमदार देरकर यांनी केली. खाण क्षेत्राशी संबंधित विविध कामांमध्ये स्थानिक तरुणांना संधी उपलब्ध करून देण्याबाबत त्यांनी प्रशासनाला स्पष्ट भूमिका घेण्याचे आवाहन केले.
🎯 उकणी परिसरातील संभाव्य भूस्खलनाचा धोका चर्चेत
उकणी परिसरात नदीकाठालगत सुरू असलेले रस्ते बांधकाम, नदीलगतचे ओव्हरबर्डन डम्पिंग आणि त्यामुळे निर्माण होणारा संभाव्य भूस्खलनाचा धोका याकडेही आमदार देरकर यांनी लक्ष वेधले. खाण क्षेत्रातील बेंच डिझाईन आणि स्लोप स्थिरतेसंदर्भातील तांत्रिक बाबींची स्वतंत्र भूवैज्ञानिक तपासणी करण्याची मागणी त्यांनी केली.
🎯 खाण प्रभावित गावांसाठी विशेष विकास आराखड्याची मागणी
खाण प्रभावित गावांमध्ये रस्ते, शुद्ध पिण्याचे पाणी, आरोग्य सुविधा, शिक्षण, पर्यावरण संरक्षण, नियमित आरोग्य तपासणी शिबिरे, मोबाईल मेडिकल युनिट तसेच सीएसआर निधीतून विकासकामे राबविण्यासाठी स्वतंत्र विकास आराखडा तयार करण्याची मागणी आमदार देरकर यांनी केली.
🎯 सीएमडींचे सकारात्मक आश्वासन
आमदार संजय देरकर यांनी मांडलेल्या सर्व विषयांची गांभीर्याने दखल घेत वेकोलीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक श्री. पांडे यांनी संबंधित प्रश्नांवर सकारात्मक आणि टप्प्याटप्प्याने कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. पर्यावरण संरक्षण, स्थानिक नागरिकांचे आरोग्य, सुरक्षा, रोजगार आणि विकास यांना सर्वोच्च प्राधान्य देत आवश्यक उपाययोजना करण्यात येतील, असे त्यांनी स्पष्ट केले.
बैठकीनंतर आमदार संजय देरकर यांनी वेकोली प्रशासनाचे आभार मानत, वणी विधानसभा क्षेत्रातील खाण प्रभावित नागरिकांच्या न्याय्य हक्कांसाठी आणि सर्वांगीण विकासासाठी आपला संघर्ष व पाठपुरावा यापुढेही अधिक तीव्रतेने सुरू राहील, असा निर्धार व्यक्त केला.
बैठकीला उपजिल्हाप्रमुख शरद ठाकरे, माजी पंचायत समिती सदस्य टिकाराम खाडे, नगरसेवक अजय धोबे, शंकर देरकर, सरपंच रुपेश ठाकरे, अनमोल पायघण, युवासेना शहरप्रमुख चेतन बोबडे, सार्थक शिर्के आणि अतुल खुटेमाटे यांची उपस्थिती होती.








