⛔सायखेडा शिवारातील दुर्दैवी घटना; पशुपालकांचे नुकसान, भरपाईची मागणी
✍️पांढरकवडा: अशफाक खान
महावितरण कंपनीच्या गंभीर निष्काळजीपणामुळे शेतात चरत असलेल्या तीन दुभत्या गायींचा विजेचा तीव्र धक्का लागून जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना रविवारी सायखेडा शिवारात घडली. या दुर्घटनेमुळे पशुपालकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून परिसरात महावितरणच्या कारभाराविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, केळापूर तालुक्यातील किन्ही-नंदपूर येथील पशुपालक डॉ. शंकरराव मिंदेवार व अभय कट्टेवार यांच्या गायी नेहमीप्रमाणे रविवारी सकाळी सायखेडा शिवारात चरण्यासाठी गेल्या होत्या. दुपारच्या सुमारास स्थानिक शेतकरी किसन भुराजी अनाके यांच्या शेतातून गेलेल्या महावितरणच्या वीजवाहिनीवरील तार अचानक तुटून खाली पडली. तुटलेली तार विद्युतप्रवाह सुरू असतानाच जमिनीवर पडल्याने चरत असलेल्या गायी तिच्या संपर्कात आल्या आणि त्यांना जबरदस्त विजेचा धक्का बसला.
या दुर्घटनेत डॉ. शंकरराव मिंदेवार यांच्या दोन दुभत्या गायी (एक पांढऱ्या रंगाची व एक लाख्या रंगाची) तसेच अभय कट्टेवार यांच्या एका गायीचा जागीच तडफडून मृत्यू झाला. मृत झालेल्या सर्व गायी दुभत्या असल्याने संबंधित पशुपालकांचे आर्थिक नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे.
घटनेच्या वेळी डॉ. मिंदेवार हे कामानिमित्त शहराबाहेर असल्याने त्यांचे मित्र विलास दिगांबर महाजन (रा. गाडगे ले-आऊट, पांढरकवडा) यांनी तत्काळ पांढरकवडा पोलीस ठाणे गाठून जबाबी रिपोर्टद्वारे तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनेची नोंद घेत पुढील तपास सुरू केला आहे.
दरम्यान, ग्रामीण भागातील अनेक ठिकाणी वीजवाहिन्या आणि तारा अत्यंत जीर्ण अवस्थेत असून त्यांच्या देखभालीकडे महावितरणकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. अशा निष्काळजीपणामुळे जनावरांसह शेतकरी आणि नागरिकांच्या जीवितालाही धोका निर्माण झाला आहे.
“आज निष्पाप जनावरांचा बळी गेला; उद्या एखाद्या शेतकऱ्याचा जीव गेला तर त्याला जबाबदार कोण?” असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. तसेच मृत गायींच्या मालकांना तातडीने योग्य आर्थिक भरपाई देऊन संबंधित अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
स्थानिक नागरिकांनी महावितरणने तातडीने जीर्ण वीजवाहिन्यांची तपासणी करून धोकादायक तारा बदलाव्यात, अन्यथा भविष्यात आणखी मोठी दुर्घटना घडू शकते, असा इशाराही दिला आहे.








