✍️वणी : प्रतीनिधी
सुशगंगा कॉलेज ऑफ फार्मसी, वणी येथील असिस्टंट प्रोफेसर प्रा. प्रशांत खंगार यांनी बी. फार्म (सेमिस्टर-६) च्या विद्यार्थ्यांसाठी लिहिलेले “A Textbook of Herbal Drug Technology” हे शैक्षणिक पुस्तक Brilliant Publication House, Akola तर्फे प्रकाशित झाले असून, त्यांच्या या उल्लेखनीय शैक्षणिक यशाबद्दल महाविद्यालयात विशेष सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले.
प्रा. प्रशांत खंगार यांनी फार्मसी शिक्षण क्षेत्रातील विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम अधिक सुलभ, समजण्यास सोपा आणि दर्जेदार स्वरूपात उपलब्ध व्हावा या उद्देशाने हे पुस्तक लिहिले आहे. विशेषतः बी. फार्म (सेमिस्टर-६) च्या विद्यार्थ्यांसाठी हे पुस्तक मार्गदर्शक ठरणार असून, हर्बल ड्रग टेक्नॉलॉजी विषयातील संकल्पना प्रभावीपणे समजून घेण्यासाठी त्याचा मोठा लाभ होणार आहे.
या गौरवप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील पवार, संस्थेचे अध्यक्ष श्री. प्रदीप बोनगीनवार तसेच उपाध्यक्ष श्री. मोहन बोनगीनवार यांच्या हस्ते प्रा. प्रशांत खंगार यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या शैक्षणिक कार्याचा गौरव करत त्यांचे अभिनंदन केले आणि हे पुस्तक फार्मसी शिक्षण क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण योगदान ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.

मान्यवरांनी आपल्या मनोगतात सांगितले की, प्राध्यापकांनी अध्यापनाबरोबरच संशोधन आणि लेखन क्षेत्रातही उल्लेखनीय कामगिरी करणे ही संस्थेसाठी अभिमानाची बाब आहे. अशा शैक्षणिक उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण अभ्यास साहित्य उपलब्ध होत असून महाविद्यालयाच्या शैक्षणिक प्रतिष्ठेतही मोलाची भर पडत आहे.
यावेळी प्रा. प्रशांत खंगार यांनी संस्थेचे पदाधिकारी, प्राचार्य, सहकारी प्राध्यापक व विद्यार्थ्यांचे आभार व्यक्त करत भविष्यातही विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी दर्जेदार पुस्तके आणि संशोधनपर साहित्य तयार करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहण्याचा संकल्प व्यक्त केला.
सत्कार समारंभाला महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रा. प्रशांत खंगार यांच्या या यशामुळे सुशगंगा कॉलेज ऑफ फार्मसीच्या शैक्षणिक गुणवत्तेला नवे बळ मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. त्यांच्या या यशाबद्दल शैक्षणिक क्षेत्रातूनही अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या भावी शैक्षणिक व संशोधन कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.








