✍️वणी | प्रतिनिधी
वणी येथील लायन्स इंग्लिश मिडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज (नांदेपेरा मार्ग, रवीनगर व देशमुखवाडी) येथे मंगळवार, दि. ३० जून २०२६ रोजी नवीन शैक्षणिक सत्राच्या प्रारंभानिमित्त विद्यार्थी प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात आणि आनंददायी वातावरणात साजरा करण्यात आला. नव्याने प्रवेश घेतलेल्या तसेच शाळेत दाखल झालेल्या विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प व चॉकलेट देऊन जंगी स्वागत करण्यात आले. शाळेच्या परिसरात विद्यार्थ्यांचा उत्साह, पालकांची उपस्थिती आणि शिक्षकांचा आत्मीय सहभाग यामुळे आनंदमय वातावरण निर्माण झाले.
कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष तथा माजी आमदार मा. संजीवरेड्डी बोदकुरवार, लायन्स क्लबचे अध्यक्ष तुषार नगरवाला, लायन्स स्कूलचे उपाध्यक्ष मा. लायन बलदेवजी खुंगर तसेच विश्वस्त मा. लायन महेंद्रजी श्रीवास्तव यांची प्रमुख उपस्थिती लाभली. याशिवाय शाळेचे अकॅडेमिक डायरेक्टर प्रशांत गोडे, प्राचार्या चित्रा देशपांडे आणि पर्यवेक्षिका सुनीता खुसपुरे यांच्यासह शिक्षकवृंद उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात विद्येची देवता माँ शारदा तसेच स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांचे पूजन करून करण्यात आली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले आणि नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभाला मंगलमय सुरुवात झाली.

यावेळी अध्यक्ष संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छा देताना शिक्षणासोबत शिस्त, संस्कार, प्रामाणिकपणा, आत्मविश्वास आणि सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकास यांचे महत्त्व अधोरेखित केले. गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवून आदर्श नागरिक बनावे, असे आवाहन त्यांनी केले.
विश्वस्त महेंद्रजी श्रीवास्तव यांनी विद्यार्थ्यांना जीवनात येणाऱ्या प्रत्येक संधीचा सकारात्मक दृष्टीकोनातून स्वीकार करून कठोर परिश्रम, चिकाटी आणि सातत्याच्या जोरावर यशाचे शिखर गाठण्याचा प्रेरणादायी संदेश दिला.
प्रवेशोत्सवाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांचे टाळ्यांच्या कडकडाटात आणि आनंदोत्सवाच्या वातावरणात स्वागत करण्यात आले. शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांना प्रेमाने शुभेच्छा देत त्यांच्यात आत्मीयतेची भावना निर्माण केली. पालकांनीही शाळेच्या स्वागत उपक्रमाचे कौतुक करत समाधान व्यक्त केले.
संपूर्ण कार्यक्रमात विद्यार्थ्यांमध्ये नव्या शैक्षणिक वर्षाबद्दल उत्सुकता आणि आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. शेवटी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देत शिक्षणाच्या नव्या प्रवासासाठी प्रेरित केले.










