✍️वणी : प्रतिनीधी
मौजे उकणी खंड-1 येथील उर्वरित 15 टक्के जमीन तातडीने संपादित करून संपूर्ण गावाचे पुनर्वसन करण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी कोळसा खान प्रकल्पग्रस्त शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने नागपूर येथील वेकोलि (WCL) मुख्यालयासमोर सुरू असलेल्या साखळी उपोषणाला महत्त्वपूर्ण यश मिळाले आहे.
आंदोलनादरम्यान सेफ्टी बोर्ड सदस्य श्री. संजय खाडे यांनी उपोषणस्थळी भेट देऊन प्रकल्पग्रस्त शेतकरी बांधवांशी संवाद साधला. त्यांनी शेतकऱ्यांच्या न्याय्य मागण्यांना पाठिंबा दर्शवत त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा विश्वास दिला.
त्यानंतर एचएमएस (HMS) युनियनचे अध्यक्ष श्री. शिवकुमार यादव, सचिव श्री. शरद धांडे, संघर्ष समितीचे पदाधिकारी आणि वेकोलिचे वरिष्ठ अधिकारी यांच्यात सविस्तर बैठक पार पडली. बैठकीला डायरेक्टर (टेक्निकल), डायरेक्टर (फायनान्स), जीएम (लँड अँड रेव्हेन्यू), जीएम (आयआर) यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत वेकोलिचे सीएमडी श्री. हेमंत पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष समिती गठित करण्यात येणार असून, येत्या 15 दिवसांत समितीचा अहवाल सादर केला जाईल. त्यानंतर उर्वरित जमीन संपादनाबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे ठोस आश्वासन प्रशासनाने दिले.
प्रशासनाकडून मिळालेल्या या लेखी व सकारात्मक आश्वासनानंतर कोळसा खान प्रकल्पग्रस्त शेतकरी संघर्ष समितीने साखळी उपोषण तात्पुरते स्थगित करण्याचा निर्णय घेतला. मात्र, समितीने दिलेल्या मुदतीत आश्वासनाची अंमलबजावणी व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
यावेळी श्री. शिवकुमार यादव, श्री. शरद धांडे, श्री. बबन उरकुडे, जीएम (आयआर), जीएम (लँड अँड रेव्हेन्यू) यांच्यासह संघर्ष समितीचे अध्यक्ष श्री. सुरेश ढपकस, कार्याध्यक्ष श्री. अमोल पूरडकर, उपाध्यक्ष श्री. पराग तुरानकर, सचिव श्री. श्यामसुंदर जुनारकर, सहसचिव श्री. सचिन लोडे, कोषाध्यक्ष श्री. मनोज खाडे, सदस्य श्री. संजय बांदुरकर, श्री. चंद्रकांत जीवतोडे, श्री. पद्माकर झाडे, श्री. महेश पाटील, श्री. विकास लालसरे, श्री. संतोष धांडे, श्री. किसन परशिवे, सौ. उषा ठाकरे, सौ. गीता पिगे, ॲड. श्री. विवेक तिवारी, श्री. सचिन क्षीरसागर तसेच संघर्ष समितीचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने प्रकल्पग्रस्त शेतकरी उपस्थित होते.










