✍️वणी : प्रतिनीधी
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या विशेष मतदार यादी पुनरीक्षण (Special Intensive Revision – SIR) अभियानाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विदर्भात संघटनात्मक हालचालींना वेग दिला आहे. मनसेचे नेते राजू उंबरकर यांनी वणी विधानसभा मतदारसंघासह अमरावती जिल्ह्यात पदाधिकारी, बूथ प्रमुख आणि कार्यकर्त्यांच्या सलग आढावा बैठका घेत आगामी निवडणुकांसाठी पक्ष संघटना अधिक सक्षम करण्यावर भर दिला.
वणी विधानसभा मतदारसंघातील मारेगाव, वणी आणि झरी जामणी या तीनही तालुक्यांमध्ये आयोजित बैठकींमध्ये पदाधिकारी व बूथ प्रमुखांना मार्गदर्शन करताना राजू उंबरकर यांनी कार्यकर्त्यांना मरगळ झटकून जोमाने कामाला लागण्याचे आवाहन केले. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये मनसेचा झेंडा फडकवण्याचे उद्दिष्ट ठेवून प्रत्येक पदाधिकाऱ्याने जबाबदारीने काम करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

यावेळी त्यांनी सांगितले की, “जनतेच्या प्रश्नांवर सातत्याने मैदानात उतरून काम करा. पक्ष संघटना बळकट करा आणि प्रत्येक गावात मनसेची ताकद वाढवा. निवडणुकीत पक्षाचा विजय निश्चित करण्यासाठी मी प्रत्येक कार्यकर्त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. कोणतीही अडचण आली तरी मी सदैव तुमच्यासोबत असेन.”
वणीपुरताच हा दौरा मर्यादित न ठेवता राजू उंबरकर यांनी अमरावती जिल्ह्यातही संघटनात्मक बांधणीला गती दिली आहे. गेल्या दोन दिवसांत अमरावती जिल्ह्यात विविध विधानसभा मतदारसंघांतील पदाधिकाऱ्यांच्या महत्त्वपूर्ण आढावा बैठका पार पडल्या.
पहिल्या दिवशी अमरावती ग्रामीणमधील तिवसा, दर्यापूर, धामणगाव रेल्वे, अचलपूर, मेळघाट आणि मोर्शी विधानसभा मतदारसंघांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. या बैठकींमध्ये SIR अभियानांतर्गत मतदार नोंदणी, नवीन पक्षप्रवेश, शाखा विस्तार आणि संघटन बळकटीकरण या विषयांवर सविस्तर चर्चा करून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
दुसऱ्या दिवशी अमरावती शहरातील अमरावती आणि बडनेरा विधानसभा मतदारसंघांतील पदाधिकाऱ्यांसोबत बैठकांचे आयोजन करण्यात आले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बूथ स्तरावरील तयारी, संघटन विस्तार आणि पक्षाची निवडणूक रणनीती यावर विशेष भर देण्यात आला.
राजू उंबरकर यांच्या या झंझावाती दौऱ्यामुळे वणी विधानसभा मतदारसंघासह अमरावती जिल्ह्यातील मनसे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, विदर्भात आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे अधिक आक्रमकपणे संघटन विस्तार आणि निवडणूक तयारीला लागल्याचे चित्र दिसून येत आहे.











