ब्रेकिंग पांढरकवडा वणी क्रिकेट संपादकीय मनोरंजन नौकरी सामाजिक विशेष देश विदेश आध्यात्मिक इतर

जिल्हा परिषदेचा रस्ता गिळंकृत? WCL विरोधात मनसे आक्रमक; दोन दिवसांत कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

On: July 17, 2026 8:07 AM
Follow Us:
---Advertisement---

✍️वणी : प्रतीनिधी

शिवणी ते मुंगोली (इ. क्र. २४३) हा जिल्हा परिषदेचा महत्त्वाचा सार्वजनिक रस्ता वेकोलि (WCL) प्रशासनाने बेकायदेशीरपणे बंद करून त्या ठिकाणी मोठा नाला खोदल्याचा गंभीर आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) केला आहे. या प्रकारामुळे स्थानिक नागरिक, शेतकरी आणि विद्यार्थ्यांच्या दळणवळणावर परिणाम झाला असून, पावसाळ्यात शिवणीसह परिसरातील गावांना पूराचा धोका निर्माण झाल्याचा दावा मनसेने केला आहे.

या प्रकरणात जिल्हा परिषद प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप करत मनसेचे वणी तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांनी जिल्हा परिषद उपविभागीय अभियंत्यांना निवेदन देत दोन दिवसांच्या आत रस्ता पूर्ववत करून वाहतुकीसाठी खुला करण्याची मागणी केली आहे. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

मनसेच्या म्हणण्यानुसार, WCL ने केवळ सार्वजनिक रस्ता बंद केला नाही, तर त्या जागेवर मोठा नाला खोदल्याने पावसाळ्यात नदीचे पाणी थेट शिवणी व आजूबाजूच्या परिसरात शिरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे गावाच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करणे आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

मनसेने या संपूर्ण प्रकरणात संबंधित WCL अधिकारी, कंत्राटदार तसेच निष्काळजीपणा करणाऱ्या संबंधित शासकीय अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. सार्वजनिक रस्ता बेकायदेशीरपणे बंद होत असताना जिल्हा परिषद प्रशासनाने कोणतीही कारवाई न केल्याने प्रशासनाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे.

निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे की, येत्या दोन दिवसांत रस्त्यावरील खोदकाम पूर्ववत करून वाहतूक सुरू करण्यात यावी. अन्यथा संबंधित अधिकारी व कंत्राटदारांविरोधात गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसह तीव्र जनआंदोलन उभारले जाईल. या आंदोलनाची संपूर्ण जबाबदारी जिल्हा परिषद प्रशासन आणि WCL व्यवस्थापनाची राहील, असा इशाराही देण्यात आला आहे.

या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी, मुख्य महाप्रबंधक (वणी एरिया), तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांना माहिती व आवश्यक कार्यवाहीसाठी पाठविण्यात आल्या आहेत.

निवेदन देताना मनसेचे तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्यासह धीरज पिदूरकर, रणजित बोन्डे, मारोती बोटपेले, महेश कुचणकर, सचिन बोरडे, भोला चिकनकर, सुरज काकडे, अनिल वासेकार, धीरज बगवा, प्रदीप बदकल, मंगेश येटे, राहुल काळे आणि उत्तम इसनकर उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment