✍️पांढरकवडा : अशफाक खान
पांढरकवडा पोलिसांनी रविवारी (26 जुलै) रात्री तालुक्यातील सुन्ना-टिपेश्वर गेट मार्गावरील ‘रोअर रिसॉर्ट’ येथे सुरू असलेल्या अवैध जुगार अड्ड्यावर धाड टाकत मोठी कारवाई केली. या कारवाईत आंध्र प्रदेशातील (तेलंगणा) आदिलाबाद परिसरातील ९ जणांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून रोख रक्कम, मोबाईल फोन, ताश पत्ते आणि तीन चारचाकी वाहने असा एकूण ₹37,24,901 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, सहायक पोलीस निरीक्षक सागर पेंढारकर यांना 26 जुलै रोजी सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास गोपनीय माहिती मिळाली होती. सुन्ना ते टिपेश्वर गेट मार्गावरील रोअर रिसॉर्टच्या बंद खोलीत परवानगीशिवाय पैशांची बाजी लावून ‘एक्का-बादशाह’ ताशपत्त्यांचा जुगार सुरू असल्याची खात्रीलायक माहिती मिळाल्यानंतर त्यांनी ही माहिती सहायक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी यांना कळवून आवश्यक परवानगी घेतली.

त्यानंतर पोलीस पथकाने पंचांसह रात्री सुमारे आठ वाजण्याच्या सुमारास रिसॉर्टवर धाड टाकली. खोलीबाहेर थांबून कानोसा घेत असताना आतून “माझ्या एक्क्यावर 500 रुपये” तसेच “माझ्या बादशहावर 500 रुपये” अशा स्वरातील पैजेचे आवाज ऐकू आल्याने जुगार सुरू असल्याची खात्री झाली. त्यानंतर पोलिसांनी खोलीत प्रवेश करून टेबलाभोवती बसून एक्का-बादशाह जुगार खेळत असलेल्या इसमांना रंगेहात पकडले.
पोलिसांनी घटनास्थळी उपस्थित सर्वांची चौकशी करून जुगार चालविण्याचा परवाना मागितला असता कोणाकडेही वैध परवाना नसल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पंचांसमक्ष सर्व आरोपींची झडती घेण्यात आली.
कारवाईदरम्यान आरोपींकडून ₹44,700 रोख रक्कम, ८ मोबाईल फोन (अंदाजे किंमत ₹1.80 लाख), तीन कॅट ताशपत्त्यांचे संच, तसेच घटनास्थळी उभ्या असलेल्या तीन चारचाकी वाहनांसह एकूण ₹37,24,901 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणात नरसिंग सुदर्शन आलुरी, श्रीनिवास नरसिमलू थोटा, आशोककुमार बाबुसिंग धारावत, तेजाराव श्यामराव म्हस्के, श्रीधर परनधाम मारीपल्ली, महेंद्र उषन्ना मंगारप्पु, सुनीलराव रामराव थाटापेल्ली, राजेश्वर येलय्या सुग्यम आणि संदेश भैय्यालाल भारद्वाज (सर्व रा. आदिलाबाद परिसर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी पांढरकवडा पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्याच्या कलम 4 व 5 तसेच भारतीय न्याय संहितेच्या कलम 49 अन्वये गुन्हा क्रमांक 2026 नोंदविण्यात आला आहे.
ही संपूर्ण कारवाई सपोनि सागर पेंढारकर यांच्या नेतृत्वाखाली पोहवा गजानन पत्रे, विजय राठोड, सूर्यकांत गिते, राम राठोड तसेच इतर पोलीस कर्मचाऱ्यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली. प्रकरणाचा पुढील तपास सपोनि सागर पेंढारकर करीत आहेत.
पांढरकवडा परिसरात अवैध जुगार अड्ड्यांवर पोलिसांनी सुरू केलेल्या धडक मोहिमेमुळे अशा बेकायदेशीर व्यवसाय करणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली असून, भविष्यातही अशा कारवाया सुरू राहणार असल्याचे दिसून येते .








