ब्रेकिंग पांढरकवडा वणी क्रिकेट संपादकीय मनोरंजन नौकरी सामाजिक विशेष देश विदेश आध्यात्मिक इतर

मोकाट गाढवांच्या हल्ल्यात गंभीर जखमी किशोर पीपलवा यांचा उपचारादरम्यान मृत्यू

On: September 19, 2026 12:01 PM
Follow Us:
---Advertisement---

पांढरकवड्यात मोकाट जनावरांचा प्रश्न ऐरणीवर; नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर — निष्पक्ष चौकशीची मागणी

✍️पांढरकवडा: अशफाक खान


शहरातील मोकाट जनावरांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून आता तो थेट नागरिकांच्या जीविताच्या सुरक्षेशी जोडला गेला आहे. शहरातील गोपाल कृष्ण मंदिरासमोर दोन मोकाट गाढवांनी केलेल्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या किशोर बालमुकुंदजी पीपलवा (वय अंदाजे ६० वर्षे) यांचा उपचारादरम्यान शनिवारी, १९ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ९ वाजून २८ मिनिटांनी मृत्यू झाला. या घटनेमुळे पांढरकवडा शहरातील मोकाट जनावरांच्या नियंत्रणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, १८ सप्टेंबर रोजी दुपारी साडेचारच्या सुमारास किशोर पीपलवा हे गोपाल कृष्ण मंदिरासमोर असताना दोन मोकाट गाढवांनी त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले. घटनेनंतर त्यांना तातडीने उमरी येथील ख्रिश्चन हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेथे वैद्यकीय तपासणीदरम्यान सिटीस्कॅन करण्यात आला असता त्यांच्या मेंदूला दुखापत झाल्याचे निदर्शनास आले.

प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना नागपूर येथे हलविण्यात आले. नागपूर येथे डॉ. अग्रवाल यांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार करण्यात आले. मात्र प्रकृतीत अपेक्षित सुधारणा न झाल्याने पुढील उपचारासाठी त्यांना पुन्हा उमरी येथील ख्रिश्चन हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. येथे उपचार सुरू असतानाच १९ सप्टेंबर रोजी सकाळी ९.२८ वाजता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

मृत्यूची माहिती मिळताच कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला. त्यानंतर मृतदेह पांढरकवडा उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी ठेवण्यात आला आहे. शवविच्छेदन व पुढील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात येणार आहे.

🎯 मुलाकडून पोलिसांत तक्रार

या घटनेप्रकरणी मृतकाचा मुलगा राम किशोर पीपलवा यांनी पांढरकवडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. घटनेची संपूर्ण चौकशी करून आवश्यक ती कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी तक्रारीत करण्यात आली आहे.

दरम्यान, युवा टायगर फोर्सनेही या गंभीर घटनेची दखल घेत पांढरकवडा पोलिसांकडे निवेदन सादर केले आहे. घटनेची निष्पक्ष आणि सखोल चौकशी करून नेमकी परिस्थिती स्पष्ट करावी तसेच या प्रकरणात संबंधितांची कायदेशीर जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.

🎯 मोकाट जनावरांच्या प्रश्नावर प्रशासनासमोर आव्हान

पांढरकवडा शहरातील विविध भागांत मोकाट जनावरे फिरत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून यापूर्वीही करण्यात आल्या आहेत. रस्ते, बाजारपेठ, मंदिर परिसर तसेच वर्दळीच्या ठिकाणी मोकाट जनावरांचा वावर वाढल्याने वाहनचालक, पादचारी, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत आहे.

मोकाट जनावरांमुळे अपघात होण्याची शक्यता असतानाच आता त्यांच्या हल्ल्यात नागरिकाचा जीव गेल्याची घटना समोर आल्याने शहरातील मोकाट जनावरांच्या नियंत्रणासाठी ठोस आणि प्रभावी उपाययोजना करण्याची गरज अधोरेखित झाली आहे. संबंधित यंत्रणेने केवळ तात्पुरती कारवाई न करता मोकाट जनावरांच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

या दुर्दैवी घटनेमुळे पांढरकवडा शहरातील नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला असून, प्रशासन या घटनेची दखल घेऊन मोकाट जनावरांच्या नियंत्रणासाठी कोणती ठोस पावले उचलते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. तसेच पोलिसांच्या चौकशीत या घटनेबाबत पुढे काय निष्पन्न होते, याकडेही सर्वांचे लक्ष आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment