ब्रेकिंग पांढरकवडा वणी क्रिकेट संपादकीय मनोरंजन नौकरी सामाजिक विशेष देश विदेश आध्यात्मिक इतर

आठवडी बाजारात ‘तितली-भवरा’ जुगारावर पांढरकवडा पोलिसांचा छापा; चौघे ताब्यात, ₹८,१०० रोख जप्त

On: September 21, 2026 3:34 PM
Follow Us:
---Advertisement---

✍️पांढरकवडा: अशफाक खान


पांढरकवडा शहरातील आठवडी बाजार परिसरात सुरू असलेल्या ‘तितली-भवरा’ नावाच्या हारजीतीच्या जुगारावर पांढरकवडा पोलिसांनी धडक कारवाई केली. या कारवाईत जुगार खेळविणाऱ्या एकासह जुगार खेळणाऱ्या तीन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून जुगाराचे साहित्य आणि रोख ₹८,१००, असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

सोमवार, २१ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ४ वाजता पोलिसांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, विरेंद्र सुरेश हामंद (वय ३४, रा. कोलाम पोड, ता. केळापूर) हा पांढरकवडा येथील आठवडी बाजारात नागरिकांकडून पैसे घेऊन ‘तितली-भवरा’ नावाचा हारजीतीचा जुगार खेळवत आहे.

माहिती मिळताच पोलीस निरीक्षक एल. डी. तावरे यांनी तातडीने डी.बी. पथकाला कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक नितीन सुशीर यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांचे पथक आठवडी बाजार परिसरात रवाना झाले. पोलिसांनी घटनास्थळी छापा टाकला असता विरेंद्र हामंद हा ‘तितली-भवरा’ जुगार खेळविताना आढळून आला.

यावेळी जुगार खेळणारे तिलक दिपक सिडाम (वय २१, रा. चंद्रशेखर वार्ड, पांढरकवडा), संतोष बाबाराव चव्हाण (वय ४०, रा. राम मंदिर वार्ड, पांढरकवडा) आणि अजय प्रकाश मडावी (वय ३४, रा. घोंसी, ता. केळापूर) हेही पोलिसांच्या हाती लागले.

पोलिसांनी संशयितांची अंगझडती तसेच त्यांच्या ताब्यातील साहित्याची तपासणी केली असता ‘तितली-भवरा’ जुगाराचे साहित्य आणि ₹८,१०० रुपयांची रोख रक्कम आढळून आली. सदर मुद्देमाल पोलिसांनी पंचनामा करून जप्त केला आहे.

या प्रकरणी संबंधित आरोपींविरुद्ध जुगार कायद्यान्वये कारवाई करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस हवालदार रजनीकांत पाटील करीत आहेत.

सदर कारवाई यवतमाळचे पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात तसेच सहायक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी, पांढरकवडा रॉबीन बन्सल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

कारवाईत पांढरकवडा पोलीस ठाण्याचे ठाणेदार एल. डी. तावरे, डी.बी. पथकातील पोलीस उपनिरीक्षक नितीन सुशीर, सफौ. प्रमोद जुनुनकर, पोहेकॉ. विलास जाधव, नापोकॉ. सुनिल राठोड, नापोकॉ. सचिन काकडे तसेच पोकॉ. राजू मुत्तलवार यांनी सहभाग घेतला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment