⛔ दाभाडी परिसरातून दिवाकर आत्रामला घेतले ताब्यात; डी.बी. पथकाच्या तपासाला यश
✍️पांढरकवडा: अशफाक खान
पांढरकवडा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या अपहरणाच्या गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई करत आरोपी दिवाकर चंदू आत्राम (वय २५, रा. सुर्ला, ता. झरी) याला तसेच संबंधित पीडित मुलीला दाभाडी, ता. झरी येथून ताब्यात घेतले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी दिलेल्या जबानी अहवालावरून पांढरकवडा पोलीस ठाण्यात अप. क्र. ११२०/२०२६, कलम १३७(२) भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी तसेच पीडित मुलीचा शोध घेण्यासाठी पोलीस यंत्रणा सक्रिय झाली होती.
या प्रकरणाचा तपास सुरू असताना पोलीस ठाण्याच्या डी.बी. पथकाला आरोपी व पीडितेच्या शोधासाठी विशेष सूचना देण्यात आल्या. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक नितीन सुशिर यांच्या नेतृत्वाखाली पथकाने गोपनीय बातमीदार नेमून आरोपीच्या हालचालींबाबत माहिती संकलित करण्यास सुरुवात केली. सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर पोलिसांना आरोपी दाभाडी परिसरात असल्याची गोपनीय माहिती मिळाली.
मिळालेल्या माहितीची खातरजमा करून पोलिसांनी नियोजनबद्ध पद्धतीने कारवाई केली. त्यानंतर दाभाडी, ता. झरी येथून दिवाकर चंदू आत्राम याच्यासह पीडित मुलीला ताब्यात घेण्यात आले. या कारवाईमुळे संबंधित गुन्ह्याच्या तपासाला महत्त्वपूर्ण दिशा मिळाली आहे.
या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक एल. डी. तावरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर पेंढारकर आणि पोलीस कॉन्स्टेबल विजय राठोड करीत आहेत. ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीकडून गुन्ह्याच्या अनुषंगाने अधिक माहिती मिळविण्यासाठी तपास यंत्रणेकडून पुढील चौकशी करण्यात येत आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, यवतमाळ, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, यवतमाळ तसेच सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी, पांढरकवडा रॉबिन बन्सल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस निरीक्षक एल. डी. तावरे यांच्या सूचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक नितीन सुशिर, सहाय्यक फौजदार प्रमोद जुनुनकर, पोलीस हवालदार विलास जाधव, नायक पोलीस कॉन्स्टेबल सुनिल राठोड, सचिन काकडे तसेच पोलीस शिपाई राजू मुत्यालवार यांनी या कारवाईत सहभाग घेतला.









