ब्रेकिंग पांढरकवडा वणी क्रिकेट संपादकीय मनोरंजन नौकरी सामाजिक विशेष देश विदेश आध्यात्मिक इतर

बसस्थानकातील पार्किंगमधून चोरीला गेलेली दुचाकी तेलंगणातून शोधून काढली; पांढरकवडा पोलिसांची कारवाई

On: September 21, 2026 2:03 PM
Follow Us:
---Advertisement---

✍️पांढरकवडा: अशफाक खान


पांढरकवडा बसस्थानकाच्या पार्किंगमधून चोरीला गेलेल्या स्प्लेंडर प्लस मोटारसायकलचा छडा लावत पांढरकवडा पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेत चोरीची दुचाकी जप्त केली. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपासाची दिशा निश्चित करत पोलिसांनी आरोपीचा माग काढत ही कारवाई केली. या कारवाईमुळे वाहनचोरीच्या प्रकरणाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रल्हाद रामदास चव्हाण (वय ४३, रा. वसंत नगर) यांनी त्यांची स्प्लेंडर प्लस मोटारसायकल क्रमांक MH 29 X 3644, अंदाजे ₹५० हजार रुपये किमतीची, पांढरकवडा बसस्थानक परिसरातील पार्किंगमध्ये उभी केली होती. मात्र, काही वेळाने ते वाहन घेण्यासाठी गेले असता मोटारसायकल जागेवर आढळून आली नाही. अज्ञात चोरट्याने मोटारसायकल चोरून नेल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पांढरकवडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

या तक्रारीवरून पांढरकवडा पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक ११३६/२०२६, कलम ३०३(२) भारतीय न्याय संहिता अन्वये अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

🎯 सीसीटीव्ही फुटेज ठरले तपासातील महत्त्वाचा दुवा

गुन्ह्याचा तपास सुरू असताना पांढरकवडा पोलीस ठाण्याच्या डी.बी. पथकाने बसस्थानक तसेच शहरातील विविध ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. फुटेजच्या बारकाईने केलेल्या पडताळणीत चोरीची मोटारसायकल घेऊन आरोपी पांढरकवड्याबाहेर गेल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. तपासादरम्यान आरोपी तेलंगणा राज्याच्या दिशेने गेल्याचे निष्पन्न झाले.

यानंतर स्थानिक गुन्हे शाखा पथकाने आरोपीचा माग काढत तपासाची चक्रे वेगाने फिरवली. अखेर मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी अफसर खान शेरखान (वय ४१, रा. यासीन प्लॉट, ताजबाग, अयोध्यानगर, नागपूर) याला ताब्यात घेतले.

त्याच्या ताब्यातून फिर्यादीची चोरीस गेलेली स्प्लेंडर प्लस मोटारसायकल क्रमांक MH 29 X 3644 पोलिसांनी जप्त केली. त्यामुळे चोरीस गेलेल्या वाहनाचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले आहे.

🎯 वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक श्री. अशोक थोरात तसेच सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी पांढरकवडा श्री. रॉबिन बन्सल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

पोलीस निरीक्षक सतीश चवरे व पोलीस निरीक्षक एल. डी. तावरे यांच्या सूचनेनुसार पांढरकवडा येथील स्थानिक गुन्हे शाखा पथक आणि डी.बी. पथकाने संयुक्तपणे ही कारवाई केली.

दरम्यान, या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक एल. डी. तावरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार राहुल भगत करीत आहेत. चोरीच्या दुचाकीचा शोध घेण्यासाठी सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून केलेला तपास आणि त्यानंतर आरोपीपर्यंत पोहोचण्यासाठी पोलिसांनी केलेली कारवाई महत्त्वपूर्ण ठरली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment