✍️पांढरकवडा : अशफाक खान
पांढरकवडा तालुक्यातील मोहदा येथे घडलेल्या तब्बल ९७ लाख रुपयांच्या सराफा दुकान फोडीच्या गाजलेल्या चोरीप्रकरणात पोलिसांना महत्त्वाचे यश मिळाले असून, पुणे जिल्ह्यातील सराईत चोरट्यांच्या टोळीतील दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने दोघांना सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली असून, चोरीतील मुद्देमालासह फरार असलेल्या आणखी चार आरोपींचा मध्यप्रदेश, गुजरात आणि राजस्थानसह विविध राज्यांत शोध सुरू आहे.
१५ जुलै रोजी पहाटे सुमारे चारच्या सुमारास मोहदा येथील राजेंद्र वर्मा यांच्या राजेंद्र ज्वेलर्स या दुकानाचे शटर तोडून चोरट्यांनी अवघ्या २० मिनिटांत ९७ लाख रुपयांचा ऐवज लंपास केला होता. यात सुमारे ४४७ ग्रॅम सोन्याचे दागिने, १५ किलो चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम असा मोठा मुद्देमाल चोरीला गेला होता. या धाडसी चोरीमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली होती.

🎯 इन्स्टाग्रामवरून दुकानाची माहिती मिळवली
पोलिस तपासात धक्कादायक बाब समोर आली आहे. आरोपींनी इन्स्टाग्रामवरील माहितीच्या आधारे सराफा दुकानाची निवड केली होती. पुण्याहून निघालेल्या या टोळीने प्रथम नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर येथे चोरीचा प्रयत्न केला; मात्र त्यात अपयश आल्याने त्यांनी पुढील लक्ष्य म्हणून मोहदा गावाची निवड केली.
🎯 रेकी करून मध्यरात्री आखला कट
टोळीतील सदस्य मंगळवारी रात्री मोहदा येथे पोहोचले. गावातील एका हॉटेलमध्ये जेवण करून त्यांनी परिसराची बारकाईने पाहणी (रेकी) केली. त्यानंतर पहाटे चारच्या सुमारास त्यांनी नियोजनबद्ध पद्धतीने दुकानाचे शटर तोडून अवघ्या काही मिनिटांत मोठा ऐवज चोरला आणि दुचाकीवरून घटनास्थळ सोडले.
यानंतर पुढे पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट कारमधून उमरखेडमार्गे बीड आणि तेथून पुण्याकडे पलायन केल्याचे तपासात निष्पन्न झाले.
🎯 पाच पथकांची मोहीम; पुण्यात जाऊन आरोपी जेरबंद
घटना उघडकीस येताच पांढरकवडा पोलिसांनी तपासाची सूत्रे वेगाने हलवली. पाच विशेष पथके तयार करून विविध दिशांनी तपास सुरू करण्यात आला. सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी पुणे परिसरातील असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी पुणे परिसरात आठ दिवस तळ ठोकून शोधमोहीम राबवली.
या कारवाईत टोळीतील विशाल रघू कुंभार (२८, रा. चाकण, ता. खेड, जि. पुणे) आणि सौरभ ऊर्फ सोरसिंग राजकुमार राठोड (३४, रा. राठोड वस्ती, डाळींब, ता. दौंड, जि. पुणे) यांना अटक करण्यात आली.

🎯 सहा दिवसांची पोलिस कोठडी
अटक आरोपींकडून तपासादरम्यान अद्याप चोरीतील मुद्देमालाबाबत समाधानकारक माहिती मिळालेली नसल्याने त्यांना पांढरकवडा न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने दोघांना सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. या काळात फरार साथीदारांचा ठावठिकाणा, चोरीतील मुद्देमाल आणि संपूर्ण कटाचा उलगडा करण्यासाठी कसून चौकशी केली जाणार आहे.
🎯 तीन राज्यांत शोधमोहीम
दरम्यान, चोरीतील बहुतांश मुद्देमाल फरार आरोपींपैकी एकाकडे असल्याची माहिती तपास यंत्रणांना मिळाली आहे. त्यामुळे मध्यप्रदेश, गुजरात आणि राजस्थान या राज्यांमध्येही शोधमोहीम तीव्र करण्यात आली आहे. पांढरकवडा पोलिसांसह गुन्हे शाखेचे विशेष पथक संयुक्तपणे या प्रकरणाचा तपास करीत असून, उर्वरित चार आरोपींना लवकरच अटक होईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.
या धाडसी चोरीचा संपूर्ण उलगडा करून ९७ लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्याचे मोठे आव्हान आता पोलिसांसमोर असून, संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष या तपासाकडे लागले आहे.








