✍️वणी : प्रतिनिधी
आषाढी एकादशीच्या पावन निमित्ताने न्यू निवेदिता पब्लिक स्कूल, वणी येथील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी पारंपरिक पंढरपूर वारीचा मनमोहक अनुभव साकारत परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण केले. महाराष्ट्राच्या समृद्ध संतपरंपरेची ओळख लहान वयातच विद्यार्थ्यांना व्हावी, त्यांच्या मनात भक्ती, संस्कार आणि सामाजिक एकात्मतेची भावना रुजावी या उद्देशाने शाळेने या विशेष उपक्रमाचे आयोजन केले.
वारीची सुरुवात टागोर चौक येथील श्री विठ्ठल मंदिरातून झाली. टाळ, ढोलकी आणि विठ्ठल नामाच्या अखंड गजरात चिमुकले वारकरी पारंपरिक वेशभूषेत उत्साहाने सहभागी झाले. “ज्ञानोबा-तुकाराम”, “विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल” अशा जयघोषांनी परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. ही वारी खाती चौक येथील श्री महादेव मंदिरापर्यंत अत्यंत शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात काढण्यात आली.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना पंढरपूरच्या ऐतिहासिक व आध्यात्मिक वारीची प्रत्यक्ष अनुभूती मिळाली. संतांच्या विचारांचा, वारकरी संप्रदायाच्या परंपरेचा आणि विठ्ठल भक्तीचा संस्कार चिमुकल्यांच्या मनावर रुजविण्याचा हा प्रयत्न सर्व उपस्थितांच्या पसंतीस उतरला.

या वारीत काश्वी, त्रिषा, माही विनोद उके, ओवी, वेद, धैर्य, भावेश, मार्ग, कुणाल, देवयानी, देवांश, कुशी, जीविका, रियांशी, गार्वी, लक्षित, कृष्णा, अमन, केविन आदी विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. त्यांच्या निरागस भक्तिभावाने आणि उत्साहाने उपस्थितांचे मन जिंकले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शेंडे मॅडम, काशीकर मॅडम, थमके मॅडम आणि प्रीती मॅडम यांनी अथक परिश्रम घेतले. तसेच कुंचमवार मॅडम यांनी संपूर्ण उपक्रमासाठी मोलाचे मार्गदर्शन केले.
आषाढी एकादशीच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना केवळ धार्मिक परंपरेची माहितीच मिळाली नाही, तर संस्कार, शिस्त, सामूहिकता आणि भक्तीभाव यांचेही मौल्यवान धडे मिळाले. न्यू निवेदिता पब्लिक स्कूलचा हा उपक्रम पालक आणि नागरिकांकडूनही कौतुकास पात्र ठरला.









