✍️यवतमाळ: अशफाक खान
यवतमाळ जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने एक हृदयद्रावक दुर्घटना घडवली आहे. दारव्हा तालुक्यातील दहेली येथील कुपटी अडाण नदीवरील पुलावरून पुराच्या पाण्यात कार वाहून गेल्याने आई आणि तिच्या दोन अल्पवयीन मुलींचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर कुटुंबप्रमुख अविनाश खंडारे यांनी प्रसंगावधान राखत झाडाचा आधार घेत तब्बल चार तास मृत्यूशी झुंज देत आपला जीव वाचवला. गुरुवार (दि. ३० जुलै) मध्यरात्री घडलेल्या या घटनेने संपूर्ण यवतमाळ जिल्हा हादरला असून लोणी गावावर शोककळा पसरली आहे.
🎯“आमची कार नदीत पडली आहे… आम्हाला वाचवा!” — मदतीसाठी आर्त हाक
आर्णी तालुक्यातील लोणी येथील अविनाश खंडारे हे पत्नी माधवी खंडारे (४०), मुलगी प्राची खंडारे (१७) आणि साची खंडारे (१२) यांच्यासह राळेगाव येथे कौटुंबिक कार्यक्रमासाठी गेले होते. कार्यक्रम आटोपून परतीच्या प्रवासात त्यांनी बोरी अरब येथे नातेवाईकांना सोडले आणि त्यानंतर दारव्हा मार्गे लोणीकडे निघाले.

दरम्यान, दहेली येथील कुपटी अडाण नदीच्या पुलावरून पुराचे पाणी वेगाने वाहत असतानाही त्यांनी कार पुलावरून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, पाण्याचा वेग इतका प्रचंड होता की काही क्षणांतच एर्तिगा कार पुलावरून नदीत वाहून गेली.
कारमध्ये पाणी शिरू लागल्याचे लक्षात येताच झाडाच्या आश्रयाला असलेले अविनाश खंडारे यांनी मोबाईलवरून नातेवाईक व गावकऱ्यांना फोन करून “आमची कार नदीत पडली आहे… आम्हाला वाचवा!” अशी आर्त हाक दिली. माहिती मिळताच गावकरी, पोलीस आणि महसूल प्रशासन घटनास्थळी धावले.
🎯 एसटी चालकाच्या सतर्कतेमुळे सुरू झाले बचावकार्य
दरम्यान, पुलाजवळ उभी असलेल्या एसटी बसच्या चालकाला नदीकाठावरील झाडावरून मदतीसाठी आवाज ऐकू आला. त्याने तात्काळ याची माहिती बचाव पथकाला दिली. त्यानंतर गावकरी, पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाने युद्धपातळीवर बचावकार्य सुरू केले.
🎯 चार तास मृत्यूशी झुंज… झाडाचा आधार ठरला जीवदान
प्रचंड प्रवाहात कार वाहून जात असताना अविनाश खंडारे यांनी प्रसंगावधान राखत नदीतील एका झाडाचा आधार घेत स्वतःचा जीव वाचवला. मुसळधार पाऊस आणि वेगवान प्रवाहामुळे बचावकार्याला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. अखेर सुमारे चार तासांच्या अथक प्रयत्नांनंतर पहाटे चारच्या सुमारास बचाव पथकाने त्यांची सुखरूप सुटका केली. त्यानंतर त्यांना तातडीने दारव्हा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

🎯 पाणी ओसरल्यानंतर कार सापडली; आई व दोन्ही मुलींचे मृतदेह बाहेर काढले
पहाटे पाण्याची पातळी कमी झाल्यानंतर नदीत अडकलेली कार शोधण्यात बचाव पथकाला यश आले.अखेर आज शुक्रवारी दुपारी 1.30 वाजता दरम्यान यवतमाळ तालुक्यातील बोरी गोसावी गावाच्या वेशीवर तिघांचेही मृतदेह आढळले त्यानंतर गावकरी, पोलीस आणि बचाव पथकाने संयुक्तपणे कार बाहेर काढली. मात्र, कारमध्ये माधवी खंडारे, प्राची खंडारे आणि साची खंडारे या तिघींचे मृतदेह आढळून आले. एकाच कुटुंबातील तीन सदस्यांचा मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
🎯 खंडारे कुटुंबावर दुःखाचा डोंगर
मृत माधवी खंडारे या तासिका तत्त्वावरील शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. तर अविनाश खंडारे यांचा हॉटेल व्यवसाय आहे. क्षणार्धात पत्नी आणि दोन मुलींचा मृत्यू झाल्याने खंडारे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
🎯 पोलीस व प्रशासनाची चौकशी सुरू
घटनेची माहिती मिळताच पोलीस, महसूल प्रशासन आणि स्थानिक नागरिकांनी तातडीने शोध व बचावकार्य सुरू केले. मात्र, नदीच्या प्रचंड प्रवाहामुळे कार काही अंतरावर वाहून गेल्याने तिघींना वाचविणे शक्य झाले नाही. मृतदेहांचा पंचनामा करून शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले असून या दुर्घटनेचा पुढील तपास सुरू आहे.
🎯 नागरिकांना प्रशासनाचे आवाहन
सध्या यवतमाळ जिल्ह्यात अनेक नद्या व नाल्यांना पूर आला असून प्रशासनाने पुलावरून पाणी वाहत असताना कोणत्याही परिस्थितीत वाहन घेऊन जाण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन केले आहे. काही क्षणांची घाई आयुष्यभराचे दुःख ठरू शकते, याची ही दुर्घटना अत्यंत वेदनादायी आठवण ठरली आहे.









