⛔न्यायालयाच्या अटकपूर्व जामीन आदेशाची अंमलबजावणी व तपासात मदतीसाठी लाचेची मागणी; पोलीस हवालदार अरविंद जाधव ताब्यात
✍️यवतमाळ : अशफाक खान
न्यायालयाने मंजूर केलेल्या अटकपूर्व जामिनाची अंमलबजावणी करण्यासाठी तसेच गुन्ह्याच्या तपासात मदत करण्याच्या मोबदल्यात १५ हजार रुपयांची लाच मागून तडजोडीनंतर १० हजार रुपये स्वीकारताना आर्णी पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात पकडले. ही कारवाई बुधवार, दि. १९ ऑगस्ट रोजी सायंकाळी आर्णी पोलीस ठाण्यात करण्यात आली.
अरविंद राजाराम जाधव (वय ४४), पोलीस हवालदार, वर्ग-३, पोलीस ठाणे आर्णी, असे एसीबीच्या कारवाईत ताब्यात घेतलेल्या लोकसेवकाचे नाव आहे. जाधव हे दिग्रस येथील आकांक्षा नगरात वास्तव्यास असल्याची माहिती एसीबीने दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराच्या भावाविरुद्ध आर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या प्रकरणात संबंधित न्यायालयाने तक्रारदाराच्या भावाला अटकपूर्व जामीन मंजूर केला होता. या गुन्ह्याचा तपास आरोपी पोलीस हवालदार अरविंद जाधव यांच्याकडे होता.
तक्रारदाराने आपल्या भावासह जाधव यांची भेट घेऊन न्यायालयाचा अटकपूर्व जामीन मंजुरीचा आदेश सादर केला आणि त्यानुसार जामिनाची कार्यवाही करण्याची विनंती केली. यावेळी जाधव यांनी न्यायालयाच्या आदेशानुसार जामीनाची कार्यवाही करून देण्यासाठी तसेच गुन्ह्याच्या तपासात सहकार्य करण्यासाठी १५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली.
तक्रार प्राप्त झाल्यानंतर एसीबीच्या पथकाने बुधवार, १९ ऑगस्ट रोजी सकाळी ११.५१ ते दुपारी १.४० वाजेदरम्यान आर्णी पोलीस ठाण्यात पंचांसमक्ष तक्रारीची पडताळणी केली. या पडताळणीदरम्यान आरोपी लोकसेवकाने १५ हजार रुपयांची मागणी केल्याचे तसेच तडजोडीनंतर १० हजार रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शविल्याचे निष्पन्न झाले.
त्यानंतर एसीबीने सापळा रचला. सायंकाळी ६.५८ ते ७.२१ वाजेदरम्यान तक्रारदाराला पंचासह आर्णी पोलीस ठाण्यात पाठविण्यात आले. यावेळी आरोपी जाधव यांनी तक्रारदाराकडून १० हजार रुपयांची लाच स्वीकारली. लाचेची रक्कम स्वीकारताच दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने जाधव यांना ताब्यात घेतले. त्यांच्या पॅन्टच्या खिशातून लाचेची १० हजार रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली.

या प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, १९८८ मधील कलम ७ अन्वये आर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आरोपी लोकसेवकास ताब्यात घेण्यात आले असून गुन्हा दाखल झाल्यानंतर अटकेची कारवाई करण्यात येणार आहे. तसेच आरोपीच्या दिग्रस येथील राहत्या घराची झडती घेण्याची कार्यवाही सुरू असल्याचे एसीबीकडून सांगण्यात आले.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, यवतमाळचे पोलीस उपअधीक्षक अभय आष्टेकर यांच्या नेतृत्वाखाली व पर्यवेक्षणाखाली करण्यात आली. सापळा पथकात पोलीस निरीक्षक मनोज ओरके, पोलीस हवालदार जयंत ब्राम्हणकर, अतुल मत्ते, सुधीर कांबळे, पोलीस शिपाई सतीश सोनवणे, महिला पोलीस शिपाई सरिता राठोड तसेच चालक पोलीस हवालदार दिनेश सरोदे यांचा समावेश होता.
या कारवाईस लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अमरावती परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक बापू बांगर यांचे मार्गदर्शन लाभले.
🎯 नागरिकांना एसीबीचे आवाहन
दरम्यान, कोणत्याही शासकीय अधिकारी अथवा कर्मचाऱ्याने शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास नागरिकांनी न घाबरता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन एसीबीकडून करण्यात आले आहे. भ्रष्टाचारासंबंधी माहिती किंवा लाच मागणाऱ्या लोकसेवकाविरुद्ध तक्रार असल्यास एसीबीच्या यवतमाळ कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.










