ब्रेकिंग पांढरकवडा वणी क्रिकेट संपादकीय मनोरंजन नौकरी सामाजिक विशेष देश विदेश आध्यात्मिक इतर

वणी लायन्स विद्यालयात ‘नशामुक्त युवा संकल्प’ अभियानाचा जागर

On: August 8, 2026 6:13 AM
Follow Us:
---Advertisement---

वणी पोलिस विभागाचा स्तुत्य उपक्रम; विद्यार्थ्यांना व्यसनमुक्त जीवनशैलीचा संदेश

✍️वणी : प्रतिनीधी


विद्यार्थ्यांमध्ये व्यसनमुक्तीबाबत जनजागृती निर्माण करून त्यांना निरोगी, सजग आणि जबाबदार नागरिक बनविण्याच्या उद्देशाने वणी पोलिस विभागाच्या वतीने वणी लायन्स चॅरिटेबल ट्रस्ट संचालित लायन्स इंग्लिश मीडियम हायस्कूल, नांदेपेरा रोड, वणी येथे विशेष जनजागृती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

‘नशामुक्त युवा संकल्प’ अभियानांतर्गत ‘ऑपरेशन प्रस्थान’ या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या व्यसनांपासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले. व्यसनमुक्त जीवनशैलीचा स्वीकार करून स्वतःचे भविष्य उज्ज्वल करण्यासोबतच समाजात सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्याचा संदेश यावेळी देण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वणी लायन्स चॅरिटेबल ट्रस्टचे विद्यमान अध्यक्ष तथा माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार होते. यावेळी ट्रस्टचे उपाध्यक्ष बलदेवजी खुगर, वणीचे ठाणेदार भानुदास पिदुरकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक कपिल पाटील तसेच पोलीस उपनिरीक्षक शेखर वांढरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी पोलिस अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत व्यसनांचे वैयक्तिक, कौटुंबिक आणि सामाजिक पातळीवरील दुष्परिणाम समजावून सांगितले. व्यसनांपासून दूर राहणे, शारीरिक व मानसिक आरोग्य सुदृढ ठेवणे आणि सकारात्मक जीवनशैली अंगीकारणे यांचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून देण्यात आले. देशातील तरुणांनी व्यसनमुक्त राहून आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रयत्न करावेत आणि विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी सक्रिय योगदान द्यावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.

अध्यक्षीय मार्गदर्शन करताना संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. विद्यार्थ्यांनी माणुसकीची जाणीव, बुद्धी आणि विवेक जागृत ठेवून व्यसनांकडे आकर्षित करणाऱ्या प्रवृत्तींपासून स्वतःला दूर ठेवावे, असे आवाहन त्यांनी केले. तरुण पिढी ही देशाची भविष्यातील ताकद असून, तिचे भविष्य निरोगी आणि व्यसनमुक्त असणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

भारताच्या भावी नागरिकांना योग्य वेळी सजग करणाऱ्या या उपक्रमाचे विद्यालयाच्या प्राचार्या सौ. चित्रा देशपांडे यांनी कौतुक केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्री. चुरे सर यांनी आभार प्रदर्शन केले.

या जनजागृतीपर उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले. विद्यार्थ्यांमध्ये व्यसनमुक्तीची जाणीव रुजविण्यासोबतच जबाबदार आणि निरोगी समाजनिर्मितीचा संदेश देणारा हा उपक्रम स्तुत्य ठरला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment