ब्रेकिंग पांढरकवडा वणी क्रिकेट संपादकीय मनोरंजन नौकरी सामाजिक विशेष देश विदेश आध्यात्मिक इतर

नशामुक्त भारत आणि अवयवदान प्रबोधन यात्रेतून जनजागृती विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; पथनाट्य, घोषणांतून व्यसनमुक्ती व अवयवदानाचा संदेश

On: August 8, 2026 12:34 PM
Follow Us:
---Advertisement---

✍️नाशिक : प्रतिनिधी

संतोष एज्युकेशन सोसायटीच्या संतोष कॉलेज ऑफ मॅनेजमेंट अँड कम्प्युटर सायन्स, म्हसरूळ यांच्या वतीने ‘नशामुक्त भारत आणि अवयवदान प्रबोधन यात्रा’ शनिवारी (८ ऑगस्ट) उत्साहात पार पडली. महाविद्यालयाच्या परिसरातून ऐरफोर्स चौक (ए. टी. पवार शाळा) या मार्गावर काढण्यात आलेल्या या प्रबोधन यात्रेत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. घोषणाबाजी, पथनाट्य आणि सामाजिक संदेशांच्या माध्यमातून नागरिकांमध्ये व्यसनमुक्ती तसेच अवयवदानाबाबत जनजागृती करण्यात आली.

सकाळी १० वाजता दोन-दोन विद्यार्थ्यांच्या रांगेत घोषणाबाजी करत प्रबोधन यात्रेला प्रारंभ झाला. ‘नशामुक्त भारत, सशक्त भारत’, ‘अवयवदान करा, जीवन वाचवा’ अशा विविध घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. प्रा. सर्वेश गोवर्धन आणि पवन भवर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी यात्रेचे नियोजन केले. प्रा. मैथिली चिखले यांनी सूत्रसंचालनाची जबाबदारी सांभाळली.

यानंतर प्रा. विश्वनाथ साठे यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. युवकांमध्ये व्यसनांचे वाढते प्रमाण, त्याचे व्यक्ती तसेच कुटुंबावर होणारे परिणाम आणि समाजाला व्यसनमुक्त करण्यासाठी आवश्यक असलेल्या जनजागृतीचे महत्त्व यावर त्यांनी प्रकाश टाकला. तसेच मृत्यूनंतर अवयवदानाच्या माध्यमातून अनेकांना नवजीवन मिळू शकते, त्यामुळे अवयवदानाविषयी समाजात असलेले गैरसमज दूर करण्याची गरज असल्याचे सांगण्यात आले.

🎯 पथनाट्यांतून प्रभावी संदेश

कार्यक्रमातील विशेष आकर्षण ठरलेल्या पथनाट्यांमधून विद्यार्थ्यांनी सामाजिक विषय प्रभावीपणे मांडले. बीसीएस कॉम्प्युटर सायन्स विभागाच्या विद्यार्थ्यांनी अवयवदान या विषयावर पथनाट्य सादर केले. अवयवदानामुळे गरजू रुग्णांना नवजीवन मिळू शकते, हा संदेश विद्यार्थ्यांनी प्रसंग आणि संवादांच्या माध्यमातून दिला. प्रा. निकिता पाटील आणि त्यांच्या टीमने पथनाट्याचे मार्गदर्शन केले.

त्यानंतर बीएससी विभागाच्या विद्यार्थ्यांनी ‘नशामुक्त भारत’ या विषयावर पथनाट्य सादर केले. व्यसनाच्या आहारी गेल्याने होणारे शारीरिक, मानसिक, आर्थिक आणि सामाजिक नुकसान विद्यार्थ्यांनी प्रभावीपणे मांडले. प्रा. प्रियंका चव्हाण आणि टीमने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

बी.ए. (कला) विभागाच्या विद्यार्थ्यांनी नशामुक्त भारत आणि अवयवदान या दोन्ही विषयांना केंद्रस्थानी ठेवून पथनाट्य सादर केले. प्रा. वैष्णवी शेवाळे, प्रा. शुभम सर आणि टीम यांच्या मार्गदर्शनाखाली सादर झालेल्या या पथनाट्याला उपस्थितांकडून चांगला प्रतिसाद मिळाला.

🎯 स्वच्छता अभियानही राबविले

प्रबोधन यात्रेसोबतच विद्यार्थ्यांनी स्वच्छता अभियान राबवून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले. सार्वजनिक परिसर स्वच्छ ठेवण्याचे आवाहन करत विद्यार्थ्यांनी स्वच्छतेचे महत्त्व नागरिकांना पटवून दिले. प्रा. साधना मेटकर आणि त्यांच्या टीमने स्वच्छता अभियानाचे नियोजन केले.

कार्यक्रमाच्या शेवटी प्रा. साक्षी साळवे आणि टीमने आभारप्रदर्शन केले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी अवयवदान आणि नशामुक्त भारताच्या घोषणा देत जनजागृती केली. प्रा. श्वेता थोरात आणि प्रा. निकिता देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाची सांगता करून विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या कॅम्पसकडे परतीचा प्रवास केला.

🎯 जागतिक आदिवासी दिनानिमित्त विशेष व्याख्यान

दरम्यान, दुपारी १ ते १.३० या वेळेत महाविद्यालयाच्या सेमिनार हॉलमध्ये जागतिक आदिवासी दिनानिमित्त विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. प्रा. चाफेकानडे यांनी यावेळी मार्गदर्शन केले. आदिवासी समाजाचा इतिहास, संस्कृती, परंपरा आणि सामाजिक योगदान याबाबत विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली.

प्राचार्य योगेश शिंदे, प्राचार्य, सचिन कापसे, प्राचार्य, कोटमे आदी उपस्थित होते. या संपूर्ण उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी केवळ जनजागृतीत सहभाग घेतला नाही, तर व्यसनमुक्त समाज, स्वच्छ परिसर आणि अवयवदानाच्या माध्यमातून जीवनदान या तीन महत्त्वपूर्ण सामाजिक संदेशांना नागरिकांपर्यंत पोहोचविले. महाविद्यालयाच्या या उपक्रमामुळे सामाजिक प्रश्नांबाबत विद्यार्थ्यांमध्ये संवेदनशीलता निर्माण होण्यास तसेच समाजात सकारात्मक विचार रुजण्यास मदत झाली.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment